Sourav Ganguly On Imran Khan: सध्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांची जोरदार चर्चा सुरू आहे. इम्रान खान हे गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. तुरुंगात कुठलीही सुविधा मिळत नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासह १४ माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. यात आता भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली देखील जोडले गेले आहेत. सौरव गांगुली यांनी देखील इम्रान खान यांच्या बचावासाठी पाकिस्तान सरकारकडे मागणी केली आहे.

क्रिकेट जगतातील माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे विश्वविजेते कर्णधार इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीत सुधारणा करण्याची आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. द एजने दिलेल्या वृत्तानुसार, ही याचिका ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी केली असून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जगभरातील दिग्गज कर्णधारांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. ज्यात कपिल देव आणि सुनील गावसकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

यासह या याचिकेवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये बेलिंडा क्लार्क, किम ह्युजेस, स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डरसारख्या दिग्गज कर्णधारांचा समावेश आहे. तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या खालावत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत, त्यांना तातडीने योग्य उपचार मिळावेत अशी मागणी दिग्गज खेळाडूंकडून केली जात आहे.

भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली माध्यमांशी बोलताना म्हणाले, “त्यांनी (माजी कर्णधारांनी) योग्य निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की, इम्रान खान यांची योग्य ती काळजी घेतली जावी आणि त्यांना सन्मान दिला जावा.” इम्रान खान यांना एकांतात ठेवलं जात असून त्यांना आपल्या कुटुंबियांनाही भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती समोर येत आहे. २०२३ मध्ये त्यांना तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. रावलपिंडीच्या अडियाला तुरुंगात असताना त्यांची दृष्टी कमजोर झाल्याच्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक करण्यात आली होती.

माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तान सरकारला लिहिलेल्या पत्रात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्यात तुरुंगात त्यांना सन्मानाने वागवले जाण्याची मागणी करण्यात आली आहे. तर स्वत:च्या पसंतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्याची मागणी, कुटुंबातील सदस्यांना त्यांना नियमितपणे भेटू देण्याची मागणी आणि कोणत्याही विलंबाशिवाय त्यांच्यावर निष्पक्ष कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.