आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारे कलाकार, दिग्दर्शक यांनी इरफानला ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन इरफान खानच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. इरफानप्रमाणे युवराज सिंह देखील काही वर्षांपूर्वी कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होता. परंतू यावर मात करत युवराजने दमदार पुनरागमन केलं. ती वेदना, तो प्रवास मी अनुभवला आहे. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील अशी मला आशा आहे, या आशायचं ट्विट करत युवराजने इरफानला श्रद्धांजली वाहिली आहे.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.