scorecardresearch

फेडररने टेनिस जगतात वेगळे वलय निर्माण केले! ; माजी खेळाडू गौरव नाटेकर यांच्याकडून स्तुती

फेडररने निवृत्तीची घाई केली, या प्रश्नावर नाटेकर म्हणाले, ‘‘निवृत्ती घेण्याची योग्य अशी कोणतीच वेळ नसते.

फेडररने टेनिस जगतात वेगळे वलय निर्माण केले! ; माजी खेळाडू गौरव नाटेकर यांच्याकडून स्तुती
(संग्रहित छायाचित्र)

संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : रॉजर फेडररने आपल्या खेळामुळे वेगळे वलय निर्माण केले आहे. त्याच्या कारकीर्दीत अनेक जण टेनिसकडे आकर्षित झाले, असे भारताचे माजी टेनिसपटू गौरव नाटेकर यांनी सांगितले.

फेडररची खेळण्याची शैली, प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्दल असलेला त्याचा आदर आणि आपल्या संघासाठीची भावना आपण फार कमी खेळाडूंमध्ये पाहतो. माझ्या दृष्टीने तो महान खेळाडू असला तरीही नदाल आणि जोकोव्हिचला विसरून चालणार नाही, असे नाटेकर यांनी सांगितले. फेडररने निवृत्तीची घाई केली, या प्रश्नावर नाटेकर म्हणाले, ‘‘निवृत्ती घेण्याची योग्य अशी कोणतीच वेळ नसते. अनेक रात्र मी झोपलो नाही, असे फेडरर म्हणाला होता. लेव्हर चषकाची संकल्पना ही स्वत: फेडररचीच आहे. ही स्पर्धा ‘एटीपी’ कार्यक्रमाचाही भाग आहे. त्यामुळे या स्पर्धेत निवृत्ती घेण्याचा त्याने विचार केला असेल. गेल्या वर्षी तो दुखापतीतून सावरत होता. वयाच्या ४१व्या वर्षी पाच सेटचे सामने खेळणे, हे त्याच्यासाठी कठीण गेले असते.’’ लेव्हर चषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी टेन १ वाहिनीवर करण्यात येणार आहे.

फेडररनंतर आगामी काळात कोणते खेळाडू हे लक्षवेधक कामगिरी करू शकतात यावर नाटेकर यांनी सांगितले की, ‘‘गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक जणांनी मला हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा पाहिली तर, कार्लोस अल्कराझ, फेलिक्स ऑगर अ‍ॅलिसिमे, यानिक सिन्नेर हे खेळाडू सध्या चांगला खेळ करताना दिसत आहेत. अल्कराझ आणि सिन्नेर हे येणाऱ्या काळात दुखापतीपासून दूर राहिले. त्यांनी आपल्या खेळात सातत्य ठेवले तर, हे दोन्ही खेळाडू भविष्यात नावारूपास येतील.

येणाऱ्या पाच ते १० वर्षांत त्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.’’ ‘‘फेडररसारखा खेळाडू मिळणे ही सोपी गोष्ट नाही. २० वर्षांपूर्वी पाहिल्यास जागतिक टेनिसमध्ये अमेरिकेची मक्तेदारी होती. गेल्या दशकापासून युरोपमधील खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय टेनिसमध्ये सुमित नागल आणि रामकुमार रामनाथनशिवाय फारसे खेळाडू दिसत नाहीत. आशियाई कनिष्ठ टेनिस स्पर्धा पुण्यात होत असून यामध्ये अनेक खेळाडू आहेत, ज्यांवर योग्य रणनीतीने मेहनत घेतल्यास ते भारताकडून चांगली कामगिरी करू शकतील,’’ असे भारतीय खेळाडूंबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाटेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या