Jonny Bairstow: इराण आणि इस्राईल या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटलं आहे. या युद्धाचा परिणाम क्रिकेटवर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. माध्यमातील काही वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, इंग्लंड लायन्सचा संघ यूएईत अडकला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, शनिवारी इराणकडून यूएईत ड्रोन हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे इंग्लंड लायन्स संघाचा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता खेळाडू आपल्या घरी जाण्यासाठी विनंती करताना दिसून येत आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मदतीची मागणी केली आहे.
पाकिस्तान शाहिन्स आणि इंग्लंड लायन्स हे दोन्ही संघ सध्या दुबईत आहे. आज दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जाणार होता. पण हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे यूएई विमानतळावरील उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे इंग्लंड लायन्सचा संपूर्ण संघ दुबईत अडकला आहे. जॉनी बेअरस्टो, अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि इतर २४ खेळाडू दुबईत अडकले आहेत.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दुबईतील अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असून खेळाडूंना सुरक्षित बाहेर काढण्याबाबत चर्चा केली आहे. दरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टोने सोशल मीडियाचा सहारा घेऊन मदतीची मागणी केली आहे. जॉनी बेअरस्टोने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “फ्लाइट रद्द झाल्यापासून आम्हाला एमिरेट्सकडून काहीही माहिती मिळालेली नाही. आम्ही अनेकदा फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळालेला नाही. कोणी आमच्याशी संपर्क साधू शकेल का?’
इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही तातडीने ॲक्शन घेतली आहे. पाकिस्तान शाहिन्स आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले की, “आमच्या संघातील खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मध्य पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीबाबत आम्ही सुरक्षा अधिकाऱ्यांशी आणि सरकारशी चर्चा करत आहोत आणि परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत.”
