न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी याला वाटते की रविचंद्रन अश्विनची त्वरीत जुळवून घेण्याची क्षमता आणि ऑस्ट्रेलियाच्या परिस्थितीबद्दल जाणून घेणे त्याला टी२० विश्वचषक स्पर्धेत मदत करू शकते. वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांचा विचार केला तर फिरकी गोलंदाज तेवढे प्रभावी नसतात. अशा परिस्थितीत भारताने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी अश्विन, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंची निवड केली आहे. लिजेंड्स क्रिकेट लीग खेळण्यासाठी भारतात आलेला न्यूझीलंडचा माजी कर्णधार व्हिटोरी म्हणाला की, “अश्विन कसोटीत यशस्वी अनुभवी फिरकीपटू आहे हे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे.”

४३ वर्षीय व्हिटोरी म्हणाला- “अश्विन अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना समजते की त्याला एखाद्या परिस्थितीत काय करायचे आहे. मला वाटते की जर तो अंतिम ११ मध्ये निवडला गेला आहे, तर त्याला त्या परिस्थितीत कशी कामगिरी करायची हे समजेल. त्याने अनेकवेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे.” व्हिटोरी पुढे असेही म्हणाला की, “रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अश्विन आगामी टी२० विश्वचषकात अष्टपैलू फिरकी गोलंदाजी खेळाडूची जागा घेऊ शकतो.” तसेच तो पुढे म्हणाला की, “भारताकडे फिरकी गोलंदाज भरपूर आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की बहुतेक फिरकीपटू अष्टपैलू आहेत आणि त्याच वेळी मला वाटते की ते अश्विनला इतरांपेक्षा वेगळे करते आणि संघाला चांगले संतुलन देते.”

हेही वाचा   :  विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची खडतर कसोटी, या पाच खेळाडूंपासून भारताने राहावे सावध 

माजी डावखुरा फिरकी दिग्गज म्हणाला की, “ऑस्ट्रेलियातील फिरकीपटूच्या यशाची गुरुकिल्ली म्हणजे अधिक टॉप-स्पिन गोलंदाजी करणे आणि उसळी मिळवणे. अशातच नॅथन लिऑनला घरच्या मैदानावर यश मिळते.” ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉन संदर्भात तो पुढे म्हणतो की, “सीम सोडल्यामुळे इतके यश त्याने मिळवले आहे. हे जवळजवळ टॉप-स्पिन रिलीझ आहे आणि तिथेच ल्योनला बाउन्स मिळतो. उपखंडात तुम्ही खेळपट्टीवर विसंबून राहू शकता, पण ऑस्ट्रेलियातील यशाची गुरुकिल्ली, बहुधा, साइड स्पिनपेक्षा अधिक टॉप स्पिन मिळवण्याची क्षमता आहे. उपखंडात साईड स्पिनला अधिक महत्त्व आहे.”

हेही वाचा   :  टी-२० विश्वचषक संघामध्ये स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनवर बीसीसीआयने सोपवली मोठी जबाबदारी 

भारतीय क्रिकेटमधील फिरकीपटूंच्या भवितव्याबाबत बोलताना तो म्हणतो की, “जेव्हा संघात अश्विन आणि जडेजासारखे मोठे गोलंदाज आहेत जे कसोटीत यशस्वी आहेत आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्यांची खेळण्याची क्षमता आहे, तेव्हा नवख्या फिरकीपटूंना त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मी आगामी युवा खेळाडूंबद्दल जास्त बोलू शकत नाही, कारण मी उल्लेख केलेल्या खेळाडूंमुळे, भारतीय फिरकी आगामी काळात चांगल्या हातात आहे.”