पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वसीम अक्रम पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) कराची किंग्जचा संचालक आहे. शिवाय, त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. मात्र, अद्याप त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासाठी ही भूमिका मिळाली नाही. या विषयावर प्रश्न विचारले असता अक्रमने आपल्याच देशाच्या समर्थकांविरुद्ध खळबळजनक वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान अक्रम म्हणाला, ”पाकिस्तानी चाहते प्रशिक्षकाचा आदर करत नाहीत, पराभवानंतर प्रशिक्षकालाच शिव्या ऐकाव्या लागतात. यासाठी मला प्रशिक्षक व्हायचे नाही. मी पाकिस्तानच्या चाहत्यांना पाहत आणि ऐकत आलो आहे. लोक प्रशिक्षकांशी कसे गैरवर्तन करतात हे मी पाहत आलो आहे. जिंका किंवा पराभव पत्करा, प्रशिक्षक खेळ खेळत नाही. प्लानिंगसाठी प्रशिक्षक जबाबदार असतो. खेळाडूंना खेळावे लागते. जर संघ हरला, तर एक राष्ट्र म्हणून प्रशिक्षकाला जेवढे दोषी ठरवले जाते, त्यापेक्षा आम्हाला अधिक पटीने ठरवले जाते. गैरवर्तन करणे मला आवडत नाही आणि मला याची भीती वाटते.

हेही वाचा – विश्वविजेते प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना मिळाली नवी भूमिका!

वसीम अक्रमने दिले भारतीय संघाचे उदाहरण

अक्रमने प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे उदाहरण दिले. अक्रम म्हणाला, ”शास्त्री यांना पाकिस्तानच्या प्रशिक्षकाप्रमाणे टीकेचा सामना करावा लागत नाही. खराब कार्यकाळानंतर खराब कार्यकाळानंतर पाकिस्तानात प्रशिक्षक हटवल्याचा इतिहास आहे. प्रत्येक वेळी पाकिस्तान हरला की प्रशिक्षकाला दोषी ठरवले जाते. पाकिस्तानी प्रेक्षक उत्साही आहेत आणि ही कोणतीही वाईट गोष्ट नाही. परंतु त्यांनी त्यांचे वर्तन सुधारले पाहिजे. भारतीय संघालाही पराभवाला सामोरे जावे लागले, पण प्रेक्षक रवी शास्त्रींना चुकीचे बोलत नाहीत.”