अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उगवता तारा म्हणून बघितले आहे. या संघाने विविध संकटांवर मात करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालिबानच्या संकटाचा सामना करत या संघाने मोठ्या धीराने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. राशीद खान, मोहम्मद नाबी आणि मुजीब उर रहमान यासारख्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक चांगले फिरकीपटू तयार झाले आहेत. परंतु, त्यांच्याकडे पाहिजे तेवढे चांगले वेगवान गोलंदाज नाहीत. अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हा चिंतेचा विषय आहे. आता ही चिंता दूर होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका दिग्गज माजी खेळाडूची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती आहे.

अफगाणिस्तानने अलीकडेच इंग्लंडचे माजी फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांची पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या साथीला आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुलची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यापासून गुल नवीन आपल्या कामाची सुरुवात करणार आहे. या दौऱ्यात अफगाणिस्तान तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी ट्वेंटी सामने खेळणार आहे.

उमर गुल हा पाकिस्तान क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज होता. ३९ वर्षीय गुलने पाकिस्तानसाठी एकूण १३७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याने विशेष प्रभाव पाडला होता. १३० एकदिवसीय सामन्यांमध्ये गुलने १७९ बळी घेतलेले आहेत. २००७ आणि २००९ या दोन्ही आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

गुलने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लगेचच प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले होते. गुलकडे देशांतर्गत स्तरावर तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पीएसएलमध्ये तो क्वेटा ग्लॅडिएटर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. याशिवाय, त्याने काश्मीर प्रीमियर लीग (केपीएल) आणि लंका प्रीमियर लीग (एलपीएल) मधील गाले ग्लॅडिएटर्स संघात कोचिंग स्टाफसोबत काम केलेले आहे.

उमर गुलने यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये अफगाणिस्तानच्या प्रशिक्षण शिबिरात गोलंदाजी सल्लागार म्हणून कार्य केले होते. त्यानंतर आता त्याची पूर्णवेळ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.