पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आगामी काळात आयपीएल स्पर्धा खेळण्याचा विचार करत आहे. ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्यानंतर आमिरला आयपीएल खेळता येऊ शकते. काही दिवसांपूर्वी, आमिरने खुलासा केला होता, की काही लोकांनी त्याला निवृत्तीसाठी भाग पाडले होते. मात्र, आता पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने आमिरवर टीका केली आहे.

”आमिरने जे काही मिळवले त्याचे श्रेय आमिरला जाते. प्रत्येकजण आपले मत देण्यास मोकळा आहे. पण माझा असा विश्वास आहे, की राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी आमिर आपल्या वक्तव्यांसह लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत आहे. इंग्लंडला जाऊन, तिथले नागरिकत्व घेऊन आणि त्यानंतर आयपीएलमध्ये खेळण्याचे वक्तव्य करून आपण त्याची मनःस्थिती समजू शकतो. स्पॉट फिक्सिंग घोटाळा असूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दयाळूपणा दाखवत त्याला राष्ट्रीय संघात पुनरागमन करू दिले. गेल्या दीड वर्षांपासून त्याची कामगिरी जवळपास शून्य झाली आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने चांगली गोलंदाजी केली होती हे मला मान्य आहे, परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीत मोठी घसरण दिसून आली”, असे कनेरियाने आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले.

कनेरिया म्हणाला, ”वाईट कामगिरीतील जेव्हा तुम्हाला संघातून काढून टाकले जाते, तेव्हा तु्म्ही म्हणता की या व्यवस्थापनासोबत तुम्ही खेळणार नाही. असे असूनही मी तुम्हाला आधार दिला. मी जेव्हा मिसबाह, हाफिजसारख्या खेळाडूंशी बोललो, तेव्हा मंडळाने त्याच्यावर दबाव आणला, की त्यांनी आमिरला पाठिंबा द्यावा आणि संघात परत आणावे. सत्य असे आहे, की काही समालोचक आमिरला पाठिंबा देऊ इच्छित नाहीत, परंतु त्यांना हे करणे आवश्यक आहे. कारण समालोचन करणे ही त्यांची उपजीविका आहे.”

आमिरची आयपीएल खेळण्याविषयी प्रतिक्रिया

एका मुलाखतीत मोहम्मद आमिरने आयपीएल खेळण्याविषयी प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला, “मी सध्या यूकेमध्ये राहण्यासाठी अनिश्चित कालावधीच्या रजेवर आहे. मी माझ्या क्रिकेटचा आनंद लुटत असून पुढील ६ ते ७ वर्ष खेळण्याची योजना आहे. पुढच्या गोष्टी कशा होतील, ते पाहू. माझी मुले इंग्लंडमध्ये मोठी होतील आणि शिक्षण इथेच पूर्ण करतील. त्यामुळे मी बराच काळ येथे राहीन यात शंका नाही.”