Iqbal Qasim On Pakistan Cricket Team: पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक असाही काळ होता, जेव्हा संघात एकापेक्षा एक स्टार फलंदाज होते. तसेच वेगवान गोलंदाजांच्या तोफ होत्या. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानची कामगिरी पाहिली, तर खेळाडू हवी तशी कामगिरी करू शकलेले नाहीत. आयसीसीच्या स्पर्धांमध्येही पाकिस्तानचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. खेळाडू देशासाठी खेळायला कमी प्राधान्य देऊन, पैशांसाठी खेळायला अधिक प्राधान्य देत आहेत. अशी जोरदार टीका पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवडकर्ते इकबाल कासिम यांनी केली आहे.
इकबाल कासिम यांना पाकिस्तानसाठी ५० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. याआधीही त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंवर टीका केली आहे. कासिम यांच्या मते, वर्तमान पाकिस्तान संघात जे खेळाडू आहेत, ते आपल्या टेक्निकवर आणि खेळावर मेहनत घेताना दिसून येत नाहीत. त्यांच्या मते युवा खेळाडू फक्त पैशांच्या मागे धावत आहेत. खरंतर देशाची जर्सी परिधान करणं हे त्यांच्यासाठी अभिमानास्पद असायला हवं.
कासिम म्हणाले, “आमच्या काळात आम्ही कसं क्रिकेट खेळायचो, याबाबत मला काहीच बोलायचं नाही. पण खरं सांगू तर, वर्तमान पाकिस्तान संघात जे खेळाडू आहेत ते आपल्या खेळावर आणि टेक्निकवर मेहनत घेताना दिसून येत नाहीत. असं वाटतं, खेळापेक्षा पैसे कमावण्यावर जास्त लक्ष आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “गेल्या काही दशकात क्रिकेट पूर्णपणे बदललं आहे, पण सक्सेस मंत्र अजूनही तेच आहे. एखादा खेळाडू वैयक्तिक उणिवा दूर करण्यासाठी आणि स्वतःच्या खेळात सुधारणा करण्यासाठी किती वेळ देतो, यावरच त्याचे यश अवलंबून असते.” कासिम यांच्या मते, सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये याच गोष्टीची कमतरता आहे.
कासिम यांच्या मते, खेळाडू आपला खेळ समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही. एखादा खेळाडू जर देशांच प्रतिनिधित्व करत असेल, तर ही अभिमानाची बाब आहे. जर एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, तर पैसा स्वत:हून त्याच्या मागे येईल. त्याला पैशांचा मागे धावण्याची गरज पडणार नाही.
