ऋषिकेश बामणे

राज्य खो-खो संघटनेसह माजी खेळाडूंचीही नाराजी

मुंबई : अल्टिमेट खो-खो लीगच्या नव्या नियमांना सध्या राज्यातील खो-खोप्रेमींसह महाराष्ट्र खो-खो संघटनेकडूनही विरोध दर्शवण्यात येत आहे. या नियमांमुळे खेळाचा मूळ गाभाच बदलला जाण्याची शक्यता असून यामध्ये बदल करण्याची सूचना महाराष्ट्र खो-खो संघटनेसह माजी खो-खोपटूंनी के ली आहे.

करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर सध्या खो-खो क्रीडा क्षेत्र ठप्प आहे. त्यामुळे सोनी क्रीडा वाहिनीवर सप्टेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या अल्टिमेट लीगच्या पहिल्या पर्वाच्या आयोजनाबाबत साशंकता कायम आहे. मात्र या लीगच्या चाचणी स्पर्धाचे आयोजन मागील काही महिन्यांच्या कालावधीत करण्यात आले. त्या चाचणी स्पर्धामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांवर सध्या माजी खो-खोपटू आणि चाहत्यांकडून टीका करण्यात येत आहे.

अल्टिमेट लीगसंबंधी कोणत्याही नियमांवर महासंघाकडून अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र कालांतराने अल्टिमेट लीगमधील नियम प्रेक्षकांना आवडले म्हणून खो-खोच्या मैदानी स्पर्धामध्येही या नियमांचा अवलंब केल्यास खेळाडू आणि खेळ या दोघांच्या दृष्टीने ते हानिकारक ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासंबंधीचे पत्रकही महाराष्ट्र खो-खो संघटनेने भारतीय खो-खो महासंघाकडे सुपूर्द केलेले आहे.

खो-खो लीगमधील अपेक्षित नियम

’ ७ मिनिटांचे प्रत्येकी ४ डाव. एकू ण २८ मिनिटांचा एक सामना.

’ प्रत्येक गडी बाद झाल्यानंतर खेळ काही सेकंदांसाठी थांबवण्यात येईल.

’ प्रत्येक संघात वेगळ्या रंगाची जर्सी घातलेले दोन वजीर असतील. त्यांना कोणत्याही दिशेने धावण्याची मुभा.

’ खुंट अथवा सूर मारून प्रतिस्पध्र्याला बाद केल्यास बोनस गुण.

’ रोटेशन पॉलिसीमुळे पहिल्या तुकडीतील बाद न झालेल्या खेळाडूला दुसऱ्या डावात उशिराने संरक्षण करण्याची संधी.

अल्टिमेट लीगसाठी आखण्यात आलेले नियम मूळ खो-खो स्पर्धामध्ये लागू करू नयेत, ही बाब मी भारतीय महासंघाच्या बैठकीत सहसचिव या नात्याने मांडलेली आहे. त्याशिवाय अल्टिमेट लीगच्या एकाही नियमावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आताच विनाकारण या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. सध्या खो-खोच्या स्थानिक पातळीवरील स्पर्धाचे आयोजन लवकर सुरू व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

      – चंद्रजीत जाधव, भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव

अल्टिमेट खो-खो लीगच्या नावातून खो-खोचे नाव काढण्यात यावे. कारण या लीगमधील अनाकलनीय नियमांमुळे खो-खोची पारंपरिक ओळख पुसली जाणार आहे. सामन्याची वेळ कमी करण्याबरोबरच वजिराची संकल्पना खेळासाठी धोकादायक आहे. खो-खोच्या अन्य स्पर्धाप्रमाणे ही स्पर्धासुद्धा मॅटवर खेळवण्यापेक्षा मातीतच बूट न घालता खेळवली पाहिजे, असे मला वाटते.

– श्रीरंग इनामदार, अर्जुन पुरस्कार विजेते माजी खो-खोपटू