आजी-माजी क्रिकेटपटूंकडून मोहम्मद शमीची पाठराखण ; पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर धर्माधांची टीका

भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली.

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्माध जल्पकांनी समाजमाध्यमांवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली.

मात्र जवळपास प्रत्येक बाबतीत धर्माचे भांडवल करणारी ही वाढती प्रवृत्ती अनेकांना अस्वस्थ आणि व्यथित करणारी ठरत आहे. या मुद्दय़ावर भारतीय संघ व्यवस्थापन किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया सोमवार रात्रीपर्यंत आलेली नव्हती. ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ला पाठिंबा देणारी मुद्रा पुढील सामन्यात शमीसाठी भारतीय संघाने करावी आणि त्याची माफी मागावी असाही सल्ला काही चाहत्यांनी दिला. 

दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले.

मात्र शमीसाठी तत्परतेने पाठिंबाही व्यक्त होऊ लागला. विख्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग, यजुवेंद्र चहल, अमोल मुझुमदार, रुद्रप्रताप सिंह; विख्यात समालोचक आणि विश्लेषक हर्ष भोगले, तसेच राहुल गांधी, मोहम्मद ओवेसी असा राजकारण्यांनी शमीची पाठराखण केली आहे. खेळामध्ये धर्माशी निगडित बाबी आणून खेळाडूंना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

.. म्हणूनच शमीवर टीका -ओवेसी

हैदराबाद : भारतीय संघात मोहम्मद शमी हा एकमेव मुस्लिम खेळाडू असल्यानेच त्याला पराभवासाठी कारणीभूत ठरवण्यात येत आहे, असा दावा ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ‘‘सर्वप्रथम तर काश्मीरात भारताचे जवान शहीद होत असताना पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याचा विचारच चुकीचा आहे. त्याशिवाय क्रिकेट संघात ११ खेळाडू असतात आणि पराभवासाठी संपूर्ण संघ जबाबदार असतो. परंतु शमी हा मुस्लिम असल्याने पराभवाचे खापर त्याच्यावर फोडण्यात आले. यावरून आपल्या देशवासीयांच्या मनात मुस्लिमांविषयी किती द्वेष आहे, हे दिसून येते,’’ असे ओवेसी म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former players politicians back shami after online abuse zws

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या