पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवर मोठं विधान केलं आहे. एहसान मनी यांनी म्हटलं की, “सध्या भाजपा सरकारकडून बीसीसीआय चालवली जात आहे. त्यामुळे दोन्ही देशात क्रिकेट सामना घ्यायचा असेल, तर आम्हीच त्यांच्या मागे का लागायचं. तेही पाकिस्तानात येऊ शकतात.

एहसान मनी पुढे म्हणाले की, ‘मी याआधीही अनेकदा सांगितलं आहे की, त्यांना खेळायचं असेल तर त्यांनी आधी पहिलं पाऊल उचलायला हवं. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होण्याला मी कधीच नकार दिला नाही. पण आम्हालाही काहीतरी आत्मसन्मान आहे. त्यामुळे आम्हीच भारताच्या मागे का लागायचं? क्रिकेट सामन्यासाठी ते तयार असतील तर आम्हीही तयार होऊ, असंही ते म्हणाले.

एहसान मनी यांनी क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना बीसीसीआय आणि पीसीबी संबंधांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, बीसीसीआयचा अध्यक्ष भलंही सौरव गांगुली असेल, पण तुम्हाला माहिती आहे का बोर्डाचा सचिव कोण आहे? भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत. तर खजिनदार पदावर आणखी एका मंत्र्याचा भाऊ आहे. त्यामुळे अध्यक्ष कुणीही असला तरी बीसीसीआयचं खरं नियंत्रण भाजपा सरकारकडून केलं जात आहे.

२०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण त्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंध बिघडल्यानंतर पाकिस्तानशी क्रिकेट खेळलं जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आयसीसीची स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाही. अलीकडेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी आयसीसीला एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशात टी-२० स्पर्धा आयोजित कराव्यात, असं म्हटलं होतं. पण बीसीसीआयने संबंधित प्रस्ताव नकारला होता. त्यानंतर आता एहसान मनी यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंधावर मोठं विधान केलं आहे.