रेफ्युजी कॅम्पमध्ये आयुष्याची उमेदीची घडणीची वर्ष गेलेले खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघाचं भूषण ठरत आहेत. स्थलांतराची प्रक्रिया म्हटलं की आफ्रिकेतून युरोपात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र या तिघांनी ठोस क्रीडा संस्कृती असणारं ऑस्ट्रेलिया गाठलं. एकीकडे ऑस्ट्रेलियात भूमीपुत्रांच्या हक्कांसाठी आवाज उठवला जात असताना या तिघांनी ऑस्ट्रेलियाला आपलंसं केलं आहे.
नेस्टरॉय इरानकुंडा २० तर मोहम्मद तौरु २२ वर्षांचा आहे. ऑस्ट्रेलियाचं भविष्य म्हणून या दोघांकडे पाहिलं जात आहे. पण दोघांचा इथपर्यंतचा प्रवास विलक्षण असा आहे. या दोघांमध्ये एक सामाईक धागा आहे तो म्हणजे स्थलांतर. नेस्टरॉय टांझानियातून तर मोहम्मद गिनी मधून आला. अॅडलेड युनायटेडच्या माध्यमातून व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून घडले. इंग्लंडमध्ये लीग फुटबॉलही खेळतात.
स्थलांतरितांविरोधात निषेधाचा सूर उमटत असताना हे दोन मित्र ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल संघाचा अविभाज्य भाग झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल संघाला सॉकरेस असं म्हटलं जातं. या संघात २६ खेळाडू आहेत. यापैकी १५ जण विविध सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिस्थितीतून आले आहेत. संघातल्या तीनपैकी एक खेळाडू विदेशात जन्मलेला आहे. यातून ऑस्ट्रेलियाची सर्वसमावेशक संस्कृती दिसून येते.
मोहम्मद मजबूत ताकद आणि वेगासाठी ओळखला जातो. तोच ऑस्ट्रेलियाचा लीड स्ट्रायकर आहे. नॉरविच सिटी संघाकडून खेळताना त्याने ११ सामन्यात ९ गोल केले. मोहम्मदचा जन्म गिनीची राजधानी कॉंकरीतल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये झाला. लायबेरियात झालेल्या युद्धामुळे त्याचे पालक गिनीत गेले. तिथे ते १४ वर्ष राहिले. मोहम्मद कुटुंबीय ऑस्ट्रेलियाला आले तेव्हा तो अवघा सात महिन्यांचा होता.
या दोघांचा सहकारी अवेर माबील याचा जन्म केनियातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये झाला. त्याचे आईवडील दक्षिण सुदानचे आहेत. तोही अॅडलेड युनायटेडसाठी खेळतो.
UNHCRच्या गेमचेजिंग टीमचा ते भाग आहेत. स्थलांतरित तसंच विस्थापित खेळाडूंचा असा हा संघ आहे.
मोहम्मदसाठी ऑस्ट्रेलियाची जर्सी परिधान करणं म्हणजे स्वातंत्र्याची अनुभूती. ‘या भूमीने आम्हाला संधी दिली. आमचं कर्तृत्व दाखवण्यासाठी व्यासपीठ दिलं. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी खेळू शकेन असं कधीही वाटलं नव्हतं’, असं मोहम्मदने सांगितलं.
नेस्टरॉयने सांगितलं की, ‘एक कृष्णवर्णीय अन्य देशात जन्मलेला खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉलचा चेहरा होतो हे किती आश्वासक आहे. कारण ऑस्ट्रेलियात खेळ संस्कृती आहे. या देशात खेळ हा जीवनशैलीचा भाग आहे. ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही संघाला, खेळाडूंना भरभरून पाठिंबा मिळतो. त्यामुळे अशा संघांचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही खास गोष्ट आहे. हे स्वप्न इतक्या लवकर प्रत्यक्षात साकारेल असं वाटलं नव्हतं’.
हॅरी केवेल, मार्क व्हिडुका, टिम काहिल यांचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला गोल्डन जनरेशन म्हटलं जातं. ‘यांचा वारसा पुढे नेण्याची संधी आम्हाला मिळते आहे याचा अभिमान आहे. टिम काहील हा माझा आदर्श होता. तो ज्या संघाकडून खेळला त्याच संघाचं मी प्रतिनिधित्व करतो आहे ही भावनाच सुखावणारी आहे. मी टीमला भेटलो नाही पण माझ्यासाठी तो अनुकरणीय आहे’, असं नेस्टरॉयने सांगितलं.
नेस्टरॉयचा जन्म टांझानियातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये झाला. त्याचे आईवडील बुरांडीचे. त्यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघातल्या आफ्रिकेची पार्श्वभूमी असणाऱ्या खेळाडूंपैकी नेस्टरॉय एक आहे. मोहम्मद गिनी आणि लायबेरियाचा आहे. ल्युकास हेरिंग्टन झिम्बाब्वेचा आहे. जेसन गेरियाची युगांडाची पार्श्वभूमी आहे. अवेर माबील आणि टेटे येंगी हे मूळचे दक्षिण सुदानचे आहेत.
आफ्रिकेची पार्श्वभूमी असणारी इतके सारे खेळाडू एकत्र एका संघात असणं हे किती अनोखं आहे असं नेस्टरॉयने सांगितलं. आफ्रिकेच्या विविध जातीपंथ आणि समाजासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. प्रचंड चपळता, लॉन्ग रेंज स्ट्राईक्स, बॅक फ्लिप सेलिब्रेशन यामुळे नेस्टरॉयकडे ऑस्ट्रेलियाचं भवितव्य या दृष्टीने पाहिले जात आहे.
२०२४ मध्ये तो अॅडलेड युनायटेडकडून बायर्न म्युनिककडे गेला. ५.५ मिलिअन डॉलर्स इतकी प्रचंड ट्रान्सफर रक्कम त्याच्यासाठी मोजली गेली. स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये अधिक सहभाग असावा यासाठी त्याने इंग्लिश चॅम्पियनशिपमधल्या वॅटफोर्ड संघाकडून खेळायला सुरुवात केली.
