विराट कोहलीच्या जागी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद अधिकृतरित्या सोपवण्यात आलं आहे. जयपूरमध्ये १७ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान रोहित शर्माकडे नेतृत्त्व देण्यात आल्यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी आपलं मत माडंलं आहे. सुनील गावसकर यांनी रोहित शर्माकडे कर्णधार सोपवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं असून यासाठी संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घेताना दीर्घकाळाचा विचार करण्याची गरज नव्हती असंही म्हटलं आहे.
गावसकरांनी यावेळी पुढील टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळला जाणार असल्याचंही सांगितलं. दरम्यान विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळण्यात आलेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या हाती निराशा आली. भारतीय संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला असून विराट कोहलीच्या कर्णधारपदाचा शेवट निराशाजनक झाला आहे. मंगळवारी रोहित शर्माकडे टी-२० संघाचं कर्णधारपद सोपवलं जात असल्याची घोषणा करण्यात आली.




गावसकरांनी स्पोर्ट्स टुडेसोबत बोलताना म्हटलं की, रोहितने याआधीही अनेकदा भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं आहे. आयसीसी ट्रॉफीसाठी संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी रोहित योग्य खेळाडू आहे. गावसकरांनी यावेळी रोहितच्या आयपीएलमधील रेकॉर्डकडेही लक्ष वेधलं. रोहितच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जिंकली आहे.
“पुढील वर्ल्ड कप दोन ते तीन वर्षांनी होईल. तर पुढील टी-२० वर्ल्ड कप १० ते १२ महिन्यांवर आहे. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळाबद्दल विचार कऱण्याची गरज नाही,” असं गावसकरांनी सांगितलं आहे.
“सध्या आयसीसी ट्रॉफीसाठी तुम्हाला योग्य नेतृत्त्व करेल अशा व्यक्तीची गरज असून तो रोहित शर्मा आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने केलेली कामगिरी पाहता त्याची निवड होणार हे स्पष्ट होतं. त्यामुळे आता रोहित शर्माकडेच कर्णधारपद असायला हवं. पुढील वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार असून त्यानंतर कदाचित दुसरा कर्णधार शोधावा लागेल. पण सध्या रोहित हाच योग्य आहे,” असं गावसकर म्हणाले आहेत.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन टी-२० सामने होणार आहेत. १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये या सामन्यांना सुरुवात होईल. दोन्ही संघ दोन कसोटी सामनेदेखील खेळणार आहेत. कानपूर आणि मुंबईत हे सामने होतील. यासोबत राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीलादेखील सुरुवात होईल.