Ian Bishop On Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी हा सध्या आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेत असलेला सर्वात तुफान फलंदाज आहे. १५ वर्षांच्या वयात या फलंदाजाने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या अनेक गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचून सुरुवात केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. तर ३६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही तो आघाडीवर आहे. त्याला बाद करताना अनेक दिग्गज गोलंदाजांना घाम फुटतो. दरम्यान वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी वैभव सूर्यवंशीला कसं बाद करायचं? याबाबत मोठा खुलासा केला आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल स्पर्धेत जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. यानंतर पॅट कमिन्सच्याही पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. यासह शार्दुल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवरही त्याने षटकार खेचला होता. त्याची फलंदाजी पाहून पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी, त्याच्या बॅटमध्ये एआय चीप फिट करण्यात आली आहे, असंही म्हटलं. यावर वैभव सूर्यवंशीने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आता इयान बिशप यांनी मोठा खुलासा केला आहे.

इएसपीएनक्रीकइन्फोवर बोलताना इयान बिशप म्हणाले, “टेक्निकली पाहिलं तर, त्याची बॅट स्विंग खूप वेगळी आहे. तो बेसबॉलसारखी बॅट स्विंग करतो. त्याची कमकुवत बाजू काय, हे आता सध्या सांगणं कठीण आहे. पण जर तुम्ही त्याच्याविरुद्ध बॅक ऑफ लेंथ गोलंदाजी करत असाल तर हे नक्कीच फायदेशीर ठरेल. जर सुरुवातीच्या षटकांमध्ये चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागणार नसेल, तर मग चेंडू मैदानाबाहेर जाऊ शकतो. आता सध्या त्याच्याविरुद्ध अशी कुठलीच रणनीती नाही.”

वैभव सूर्यवंशी २०२५ मध्ये पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरला होता. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली होती. यासह आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार खेचला होता. त्याचा हाच फॉर्म आयपीएल २०२६ स्पर्धेतही पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये त्याने ४०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३६ चेंडूत शतक झळकावलं होतं. तर २ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने ४४.४४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर २३८.१० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.