Team India Playing XI: आयपीएल स्पर्धेत सध्या युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबचा युवा फलंदाज कुपर कॉनोलीने दमदार शतकी खेळी केली. त्याआधी भारताचे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंगसारख्या युवा खेळाडूंनी देखील तुफान फटकेबाजी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी आयपीएल २०२६ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारतीय संघाची प्लेईंग ११ निवडली आहे. या प्लेईंग ११ मध्ये त्यांनी अशा खेळाडूंना स्थान दिलं आहे, जे सध्या भारतीय संघाचा भाग नाहीत.
इयान बिशप यांनी इएसक्रीकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना इयान बिशप यांनी सलामीवीर फलंदाज म्हणून शुबमन गिलची निवड केली आहे. तर त्याचा जोडीदार म्हणून त्यांनी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची निवड केली आहे. यासह त्यांनी प्रभसिमरन सिंगला देखील स्थान दिलं आहे. त्यांच्या मते, प्रियांश आर्य देखील या संघाचा भाग होता. पण प्रभसिमरन सिंगने त्याहून चांगली कामगिरी केली आहे.
सध्या पंजाब किंग्जचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची त्यांनी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवड केली आहे. त्यानंतर रजत पाटीदार आणि देवदत्त पडिक्कलला या संघात स्थान दिलं आहे. श्रेयस अय्यर आणि देवदत्त पडिक्कल यांना त्यांनी मधली फळी सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.
यासह गोलंदाजी करण्यासाठी त्यांनी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिलं आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी युजवेंद्र चहलची निवड केली आहे. यासह अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी कृणाल पंड्या आणि नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान दिलं आहे.
अशी आहे इयान बिशप यांनी निवडलेली भारताची मजबूत प्लेईंग ११
शुबमन गिल, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, नितीश कुमार रेड्डी, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल
