Kapil Dev On Virat Kohli And Rohit Sharma Future: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आहेत. गेल्या १ दशकापासून दोघांनी मिळून भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर दोघांनी निवृत्तीची घोषणा केली होती. येत्या २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. विराट आणि रोहितने अनेकदा ही स्पर्धा जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण दोघांचं संघातील स्थान अजूनही कन्फर्म झालेलं नाही. दरम्यान भारताचे दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी विराट – रोहितच्या वर्ल्डकप खेळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा फ्लॉप ठरला होता. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला होता. पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे की, रोहित कुठेही जाणार नाही. त्यामुळे तो २०२७ चा वर्ल्डकप खेळताना दिसून येऊ शकतो. दरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल देव म्हणाले की, “क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूचं स्थान फिक्स नसतं. जो चांगली कामगिरी करतो, त्यालाच खेळायची संधी मिळते. मग तो कोण आहे, याने काहीच फरक पडत नाही. मला तरी हेच वाटतं की, खेळाडूची कामगिरी पाहा, जर तो चांगला खेळत असेल तर त्याला खेळू द्या.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “ज्यावेळी सचिन तेंडुलकरने निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी त्याच्यात खूप क्रिकेट शिल्लक होतं. हा निवडकर्त्यांचा निर्णय आहे. कोणाला खेळवायचं आणि कोणाला बाहेर करायचं, हे मी सांगू शकत नाही. ही निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. मी तर फक्त टीव्हीवर सामना पाहून माझं मत मांडू शकतो.”

निवडकर्ते चांगलाच निर्णय घेतील असं कपिल देव यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, “रोहित आता २० वर्षांचा राहिलेला नाही, तो ४० वर्षांचा आहे. प्रत्येक खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागते. पण त्याने केवळ भारतीय क्रिकेटप्रेमींना नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना जो आनंद दिला आहे, त्यासाठी त्याला सलाम.”