वृत्तसंस्था, मेलबर्न

चपळ हालचाली आणि ताकदवान फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्सच्या गेल मोन्फिसने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला भावपूर्ण निरोप दिला. चाहत्यांचा लाडका टेनिसपटू अशी ख्याती असलेल्या मोन्फिसला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मोन्फिसला एका सेटची आघाडी टिकवण्यात अपयश आले. पात्रता फेरीतून आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेन स्विनी याने चार तास रंगलेल्या लढतीत मोन्फिसचा ६-७ (३-७), ७-५, ६-४, ७-५ असा पराभव केला. मोन्फिससाठी ही २०वी आणि अखेरची ऑस्ट्रेलियन स्पर्धा ठरली.

यंदाच्या हंगामानंतर आपण निवृत्त होणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले आहे. कारकीर्दीमधील अखेरची ऑस्ट्रेलियन स्पर्धा खेळणाऱ्या लाडक्या मोन्फिसला निरोप देण्यासाठी किया एरिना येथे चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. प्रेक्षकांतून होणारा मोन्फिसच्या नावाचा गजर आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी चाहत्यांनी गायलेली गाणी यामुळे वातावरण भारावून गेले होते. त्यामुळे हरल्यानंतरही परंपरा मोडून मोन्फिस कोर्टवर थांबला आणि चाहत्यांशी संवाद साधला. ‘‘माझा प्रवास खूप पूर्वी सुरू झाला. आज २०२६ वर्ष उजाडले आहे. आयुष्यात थांबण्याची हीच अंतिम रेषा आहे. तुमच्यासारख्या टेनिसप्रेमी चाहत्यांसमोर इतकी वर्षे खेळायला मिळाले हे मी माझे भाग्य मानतो,’’ अशा शब्दांत मोन्फिसने आपल्या भावना व्यक्त केल्या.

गतविजेत्यांचा विजय

पुरुष आणि महिला विभागातील गतविजेते अनुक्रमे यानिक सिन्नेर आणि मॅडिसन कीज यांनी आपल्या मोहिमेस यशस्वी सुरुवात केली. सिन्नेरला विजयासाठी फार झुंजावे लागले नाही. पहिल्या फेरीत सिन्नेरकडे ६-२, ६-१ अशी आघाडी असताना प्रतिस्पर्धी हुगो गॅस्टन याने दुखापतीमुळे अचानक सामना सोडून दिला. गॅस्टन किंवा त्याच्या व्यवस्थापनाने दुखापतीचे कुठलेही कारण दिले नाही. महिलांमध्ये ओलोक्झांड्रा ओलिनिकोव्हाच्या अ-पारंपरिक शैलीविरुद्ध मॅडिसन कीजला सुरुवातीला संघर्ष करावा लागला. अखेरीस मॅडिसनने पहिल्या फेरीचा अडथळा ७-६ (८-६), ६-१ अशा विजयासह पार केला.

स्टिफन्स पराभूत

अमेरिकन स्पर्धेतील माजी विजेती स्लोआने स्टिफन्स हिला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. कॅरोलिना प्लिस्कोवाने तिला ७-६ (८-६), ६-२ असे पराभूत केले. पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टनला संघर्ष करावा लागला. शेल्टनने ह्युगो हम्बर्टवर सरळ तीन सेटमध्ये विजय मिळविला असला, तरी त्याला दोन सेट जिंकण्यासाठी टायब्रेकरपर्यंत खेळावे लागले. शेल्टनने ही लढत ६-३, ७-६ (७-२), ७-६(७-५) अशी जिंकली. पाचव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीला बेल्जियमचा प्रतिस्पर्धी राफेल कोलिग्नॉन याने लढत सोडल्यामुळे पुढे चाल देण्यात आली.

पूनाचाचे आव्हान संपुष्टात

भारताच्या निकी पूनाचा याला थायलंडच्या प्रुचिया इसारो याच्या साथीत दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पूनचा-इसारो जोडीला पहिल्याच फेरीत पेड्रो मार्टिनेझ आणि ग्वामे मुनार जोडीकडून ६-७ (५-७), ५-७ अशी हार पत्करावी लागली.

जोकोविचची अशीही दादमोन्फिसने आपली ही अखेरची ऑस्ट्रेलियन स्पर्धा असेल असे आधीच सांगितले होते. हे लक्षात ठेवून इतकी वर्षे बरोबर खेळणाऱ्या सहकाऱ्याच्या कारकीर्दीला दाद देताना नोवाक जोकोविचने पहिल्या फेरीच्या लढतीत मोन्फिस मारतो तसा उडी मारून फोरहॅण्डचा फटका मारत त्याच्या कारकीर्दीला सलाम केला होता. मोन्फिसने पहिल्या सेटच्या उत्तरार्धात वैशिष्ट्यपूर्ण उडी घेत फोरहॅण्डचा फटका मारला. त्याचा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी आणि महिला एकेरीतील बारावी मानांकित खेळाडू एलेना स्विटोलिना देखील उपस्थित होती.