France Scripted History in FIFA World Cup: फ्रान्सने फिफा विश्वचषक २०२६ मधील आपली विजयी घोडदौड कायम राखत राऊंड ऑफ-३२ मध्ये स्वीडनचा ३-० अशा फरकाने पराभव केला. या दमदार विजयासह फ्रान्सने स्पर्धेच्या इतिहासात एका नव्या विक्रमाचीही नोंद केली. कायलिन एम्बाप्पेने या सामन्यात २ गोल्स केले.
दिदिएर देशाँ यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सच्या संघाने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सलग पाच सामन्यांत तीन किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा पहिला संघ बनण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. फ्रान्सच्या दमदार विजयानंतर फिफाने सोशल मीडियावर पोस्ट करत हा विक्रम सांगितला. फिफाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सलग पाच सामन्यांत तीन किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा फ्रान्स हा पहिलाच संघ ठरला आहे.”
दरम्यान, स्टार स्ट्रायकर किलियन एम्बाप्पेने पुन्हा एकदा आघाडीवरून नेतृत्व करत दोन गोल केले आणि फ्रान्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. ब्रॅडली बार्कोलानेही एक गोल करत आपलं योगदान दिलं. या शानदार कामगिरीच्या जोरावर फ्रान्सने स्पर्धेतील सलग विजयांची मालिका कायम राखत दिमाखात उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ-१६ फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात दोन गोल झळकावत किलियन एम्बाप्पेने फिफा विश्वचषकातील आपल्या गोलांची संख्या 18 वर नेली. यासह त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं. त्याने मिरोस्लाव क्लोझ याला दोन गोल्सने मागे टाकलं असून, अव्वल स्थानावरील लिओनेल मेस्सी याच्यापेक्षा तो आता केवळ एका गोलने मागे आहे. पहिल्या हाफमध्ये फ्रान्सने वर्चस्व गाजवलं होतं आणि अखेर एम्बाप्पेने पेनल्टी क्षेत्रात गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये स्वीडनला पुनरागमनाची फारशी संधी मिळाली नाही. मायकेल ऑलिस याने प्रथम ब्रॅडली बारकोला याच्या गोलसाठी अचूक पास दिला. त्यानंतर पुन्हा एकदा एम्बाप्पेसाठी गोलची संधी निर्माण केली आणि एम्बाप्पेने सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदवला. या गोलसह विश्वचषकाच्या बाद फेरीतील त्याच्या गोल्सची संख्या १० वर पोहोचली. सामन्यानंतर फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक दिदिए देशाँ यांनी संघाच्या आणखी एका दमदार कामगिरीचे कौतुक केलं.
या विजयासह फ्रान्सने आपल्या इतिहासात सातव्यांदा फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ-१६) फेरीत प्रवेश केला. यापूर्वी १९८६, १९९८, २००६, २०१४, २०१८, २०२२ आणि आता २०२६ मध्ये फ्रान्सने ही कामगिरी केली आहे. सलग सर्वाधिक वेळा या फेरीत पोहोचण्याचा विक्रम ब्राझीलच्या नावावर असला, तरी फ्रान्सने पुन्हा एकदा जागतिक फुटबॉलमधील आपले सातत्य सिद्ध केले आहे.
