मिश्र दुहेरीच्या जेतेपदासाठी सामना; जोकोव्हिचची उपांत्य फेरीत घोडदौड; सेरेनाची संघर्षमय वाटचाल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिसचा झेंडा अभिमानाने फडकवणारे लिएण्डर पेस आणि सानिया मिर्झा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. रिओ ऑलिम्पिकद्वारे सातव्यांदा विक्रमी ऑलिम्पिकवारी करण्यासाठी उत्सुक पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि एडय़ुअर्ड रॉजर व्हॅसेलीन जोडीवर ६-३, ३-६ (१०-७) अशी मात केली. सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिग जोडीने क्रिस्तिना लाडेनोव्हिक आणि पिआर ह्युज हरबर्ट जोडीवर ६-४, ६-३ असा विजय मिळवला. रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाची अद्याप निवड झालेली नाही. मात्र ग्रँड स्लॅम जेतेपदासह ऑलिम्पिकसाठी नाव पक्के करण्यासाठी हे दोघेही आतूर आहेत. लंडन ऑलिम्पिकवेळी भारतीय टेनिस संघाच्या निवडीवरुन अशोभनीय तमाशा झाला होता. यंदा होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकवारीसाठीच्या भारतीय टेनिस संघाबाबत स्पष्टता झालेली नाही. या पाश्र्वभूमीवर भारताच्या सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये रंगणारा मुकाबला अव्वल दर्जाच्या खेळाची पर्वणी ठरणार आहे. पेसने कारकीर्दीत ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मिश्र दुहेरीची नऊ जेतेपदे नावावर केली आहेत. मात्र फ्रेंच खुल्या स्पर्धेत त्याला मिश्र दुहेरीत जेतेपद पटकावता आलेले नाही. सानिया मिर्झाने कारकीर्दीत ग्रँड स्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीचे तीन जेतेपदे पटकावली आहेत. महिला दुहेरीत आलेले अपयश बाजूला सारत जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सानिया उत्सुक आहे. दरम्यान, कारकीर्दीत ग्रॅण्ड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतुर नोव्हाक जोकोव्हिचने सरळ सेट्समध्ये टॉमस बर्डिचचा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिइमने कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची किमया केली. महिलांमध्ये सेरेना विल्यम्स आणि किकी बर्टन्स यांनीही उपांत्य फेरीत वाटचाल केली. पावसाच्या व्यत्ययामुळे जोकोव्हिचला सलग दोन दिवस सामने खेळावे लागले. मात्र त्याचा जराही परिणाम होऊ न देता त्याने बर्डिचवर ६-३, ७-५, ६-३ असा दणदणीत विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने या लढतीदरम्यान रागाने फेकलेली रॅकेट पंचांना लागणार होती. तसे झाले असते तर जोकोव्हिचचा स्पर्धा प्रवास तिथेच संपुष्टात आला असता. उपांत्य फेरीत जोकोव्हिचची लढत डॉमिनिक थिइमशी होणार आहे. थिइमने डेव्हिड गॉफिनवर ४-६, ७-६ (९-७), ६-४, ६-१ अशी मात केली. २२ वर्षीय डॉमिनिकने स्पर्धेत आतापर्यंत अव्वल खेळाडूंना पराभवाचा दणका दिला आहे. महिलांमध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी संघर्ष करावा लागला. सेरेनाने युलिआ पुतिनेत्सोव्हावर ५-७, ६-४, ६-१ असा विजय मिळवला. सेरेनाच्या हातून झालेल्या तब्बल ४३ चुकांमुळे युलिआ खळबळजनक विजय नोंदवणार अशी चिन्हे होती. मात्र पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने लौकिकाला साजेसा खेळ करत बाजी मारली. २२वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावत स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून सेरेना केवळ दोन विजय दूर आहे. बिगरमानांकित किकी बर्टन्सने आठव्या मानांकित तिमेआ बॅसिनझस्कीला ७-५, ६-२ असे नमवत कारकीर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला. करमनकौर तिसऱ्या फेरीत मुलींच्या दुहेरीत भारताच्या करमनकौर थांडीने जैइमी फौर्लीस जोडीने अमांडा अॅनिसिमोव्हा आणि कॅटी मॅकनली जोडीवर ४-६, ७-५, ११-९ अशी मात केली.