फ्रेंच ओपन (French Open 2017) स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णाने कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले आहे. सुमारे १ तास ६ मिनिटे चाललेल्या या स्पर्धेत रोहन आणि ग्रॅब्रिएलाने प्रतिस्पर्धी जोडीचा २-६, ६-२ आणि १२-१० असा पराभव केला. ग्रँड स्लॅम जिंकणारा बोपण्णा हा भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे.

फ्रेंच ओपनमध्ये मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीमध्ये गुरुवारी रोहन बोपण्णा आणि कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीची लढत आर. फराह आणि अली ग्रोनेफिल्ड यांच्याशी होती. या लढतीमध्ये पहिला सेट फराह- ग्रोनेफिल्ड या जोडीने जिंकल्याने बोपण्णा- गॅब्रिएलावरील दबाव वाढला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये या जोडीने जोरदार पुनरागमन करत प्रतिस्पर्धी जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. तिसरा सेट मात्र कमालीचा रंजक ठरला होता. तिसऱ्या सेटमध्ये फराह- ग्रोनेफिल्डने बोपण्णा- गॅब्रिएला या जोडीला ‘काँटे की टक्कर’ दिली. पण शेवटी बोपण्णा- गॅब्रिएलाने तिसरा १२-१० ने जिंकला आणि बोपण्णाने मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. तासाभरापेक्षा जास्त काळ रंगलेल्या या सामन्याने क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा बोपण्णा चौथा खेळाडू ठरला आहे.