अर्थ ती देईल का?

मी अजूनही टेनिस स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वोत्तम आहे असे मला वाटते.

सुप्रिया दाबके

सध्या सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सर्वोत्तम महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सला दुसऱ्याच फेरीतून दुखापतीमुळे घ्यावी लागलेली माघार टेनिस जगताला खटकली. २०१७ पासून एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा सेरेनाला जिंकता आलेली नसली तरी तिच्यासारखी असणारी जिद्द, तंदुरुस्ती, सातत्य, कोर्टवरील सहज वावर, ताकदीचे फटके हे खेळणारी  टेनिसपटू सध्या अस्तित्वात नाही. या विविध वैशिष्टय़गुणांमुळे सेरेनाने निवृत्ती पत्करली नसली तरी ३९ वर्षे वय आणि अधूनमधून होणाऱ्या दुखापती तिच्या वाटचालीत अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची माजी टेनिसपटू मार्गारेट कोर्ट यांच्या २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या विश्वविक्रमाशी ती बरोबरी साधू शकेल का, हा प्रश्न टेनिसजगताला पडला आहे.

‘‘मला टेनिस स्पर्धेत सहभागी व्हायला नेहमीच आवडते. टेनिस कोर्टवर उतरून लढती खेळायच्या हेच माझे नेहमी ध्येय असते. मी अजूनही टेनिस स्पर्धामध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वोत्तम आहे असे मला वाटते. ज्या वेळी मला मी खेळण्याच्या दृष्टीने तंदुरुस्त वाटणार नाही, त्या वेळी विचार करता येईल. मात्र अजूनही मी एका ध्येयाच्या जवळ आहे असे मला वाटते आणि तीच बाब मला सतत प्रोत्साहन देते,’’ असे सेरेना विल्यम्स म्हणते.

सलग २२ वर्षे सेरेना आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धामध्ये वर्चस्वपूर्ण कामगिरी करून आजही ग्रँडस्लॅम विजेतेपदाची दावेदार म्हणून ओळखली जाते. गेल्या महिन्यात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारून सेरेनाने तिच्यातील सर्वोत्तम खेळ आताही युवा खेळाडूंप्रमाणे असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत तिचा बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाकडून झालेला पराभव टेनिसप्रेमींना भावला नाही. गेल्याच आठवडय़ात सेरेनाने वयाची ३९ वर्षे पूर्ण के ली. मात्र तरीदेखील फ्रेंच स्पर्धेत ती मोठय़ा जिद्दीने सहभागी झाली होती. जोडीला अमेरिकन स्पर्धेत तिच्या पायाच्या टाचेला झालेली दुखापत होतीच. मात्र हार मानणे हे सेरेनाच्या शब्दकोशात नाही. अखेर चालता येणे अशक्य झाल्याने नाइलाजास्तव माघार घेण्यावाचून तिच्यासमोर पर्याय उरला नाही. तिच्या माघारीसह अनेकांनी तिच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू केल्या. मात्र त्यांनाही सेरेनाने यापुढेही खेळत राहणार असल्याचे बजावले. २००६ नंतर प्रथमच या वर्षी सेरेना चारपैकी एकाही ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठू शकलेली नाही.

सेरेनाची मोठी बहीण माजी ग्रँडस्लॅम विजेती व्हिनस विल्यम्स वयाच्या चाळिशीतही ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत आहे. मात्र ती पहिल्याच फेरीत बाद होत आहे. सेरेना मात्र आजही जागतिक क्रमवारीत अव्वल १०मध्ये टिकू न आहे. तिला फ्रेंच स्पर्धेत सहावे मानांकन मिळाले होते. पहिल्या फेरीत पहिल्या सेटमध्ये अमेरिकेच्याच ख्रिस्ती अ‍ॅनविरुद्ध खेळताना सेरेना पिछाडीवर होती. मात्र ती भरून काढत तिने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाने सर्वच्या सर्व म्हणजे सहा गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र टाचेच्या दुखापतीमुळे सेरेनाच्या स्वप्नाला लगाम घातला.

सेरेनाला विक्र माने हुलकावणी दिली, तरी तिची महानता थोडीही कमी होणार नाही, कारण १९९८ पासून आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धामध्ये सहभागी होताना तिने नेहमीच तिच्या सर्वोत्तम खेळाने वर्चस्व गाजवले आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकू न सेरेनाने २३व्या ग्रँडस्लॅमवर शिक्कामोर्तब केले, तेव्हा तिने जर्मनीची माजी खेळाडू स्टेफी ग्राफचा २२ ग्रँडस्लॅमचा विक्रम मोडला. या स्पर्धेच्या वेळी ती गरोदर होती. तिच्यातील असलेली अफाट जिद्द त्यातूनच संपूर्ण जगताला कळली होती. मातृत्वानंतरदेखील तिने दमदार पुनरागमन करत निवृत्तीच्या चर्चाना पूर्णविराम दिला. २०१८ मध्ये म्हणजेच पुनरागमनानंतर विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपदाची तिने अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिथेही २४व्या ग्रँडस्लॅमपासून ती दूर राहिली. २०१९ मध्ये पुन्हा विम्बल्डन आणि अमेरिकन स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २०२० या वर्षांच्या सुरुवातीलाच ऑकलंड येथील ‘डब्ल्यूटीए’ ही महिलांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिला जिंकता आली. मातृत्वानंतर ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सेरेनाला जिंकता आली होती.

सेरेनाची कामगिरी जरी उत्तम होत असली तरी विक्र मी ग्रँडस्लॅम जेतेपदाचे अपूर्णत्व कायम आहे. पुनरागमनही झोकातच असते, हे सेरेनाने वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्यामुळे सध्याच्या पायाच्या दुखापतीतूनही ती दणक्यात पुनरागमन करेल अशीच अपेक्षा तिच्या चाहत्यांसह टेनिसजगताला आहे. सध्याच्या महिलांच्या ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये विजेतेपदाचा दावेदार ठरवणे अवघड असते. मात्र सेरेना तिच्या नेहमीच्या लयीत असताना ही अडचण टेनिसप्रेमींसमोर नव्हती. पण सध्या तरी ‘हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का?’ अशी भावना तिच्या चाहत्यांमध्ये असणार, यात नवल नाही.

supriya.dabke@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: French open 2020 women tennis player serena williams zws