एपी, पॅरिस : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीत त्याच्यासह दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवलाही आगेकूच करण्यात यश आले. युवा व्होल्गर रूनने १४व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हला पराभवाचा धक्का दिला. महिलांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोव्हा, अलाइज कॉर्ने आणि डॅनिएले कॉलिन्स यांनी विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.

गतविजेत्या जोकोव्हिचने पहिल्या फेरीच्या लढतीत जपानच्या बिगरमानांकित योशिहितो निशिओकावर ६-३, ६-१, ६-० असा सहज विजय मिळवला. त्याचा पुढील फेरीत अ‍ॅलेक्स मोल्कानशी सामना होईल. अन्य एकेरीच्या सामन्यात मेदवेदेवने अर्जेटिनाच्या फाकुंडो बाग्निसला ६-२, ६-२, ६-२ असे पराभूत केले. डेन्मार्कच्या रूनने शापोव्हालोव्हला ६-३, ६-१, ७-६ असे सरळ सेटमध्ये नमवत धक्कादायक निकालाची नोंद केली. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही सेटमध्ये रूनने चमक दाखवली. तिसऱ्या सेटमध्ये शापोव्हालोव्हने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला पराभव टाळता आला नाही. तसेच सातव्या मानांकित आंद्रे रूब्लेव्हने कोरियाच्या क्वॉन सून-वूला ६-७ (५-७), ६-३, ६-२, ६-४ असे नमवत दुसरी फेरी गाठली.

महिलांमध्ये चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाने फ्रान्सच्या तेसावर २-६, ६-३, ६-१ अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. फ्रान्सच्या कॉर्नेने जपानच्या मिसाकी डोईला ६-२, ६-० असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तर, अमेरिकेच्या नवव्या मानांकित कॉलिन्सने बल्गेरियाच्या व्हिक्टोरिया तोमोव्हाचे आव्हान ६-०, ६-४ असे परतवून लावले.

बोपण्णा-मिडलकूप दुसऱ्या फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार मात्वे मिडलकूप यांनी फ्रान्सच्या लुका व्हॅन आस्चे आणि साशा वेनबर्ग जोडीवर ६-४, ६-१ अशी मात करत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये फ्रान्सच्या जोडीने बोपण्णा-मिडलकूप जोडीला आव्हान दिले. मात्र, दुसरा सेट त्यांनी तब्बल पाच गुणांच्या फरकाने जिंकला.