पॅरिस : चारवेळच्या विजेत्या इगा श्वीऑटेक हिने आपली दमदार आगेकूच कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. श्वीऑटेकने आपल्या देशाच्या मॅग्डा लिनेट्टेचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केला.

चौथ्या फेरीत श्वीऑटेकची गाठ ही युक्रेनच्या मार्टा कोस्त्युक हिच्याशी पडणार आहे. यंदाच्या हंगामात कोस्त्युकने क्ले कोर्टवर सलग चौदा सामन्यात अपराजित आहे. पंधराव्या मानांकित कोस्त्युकने स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलुबिच हिचा ६-४, ६-३ असा पराभव केला. महिला एकेरीतच आठव्या मानांकित मिरा आंड्रीवा हिने आगेकूच कायम राखताना चौथ्या फेरीत प्रवेश केला. मिराने चेक प्रजासत्ताकच्या मारी बोझकोव्हचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-२ असा पराभव केला.

पुरुष एकेरीत पॅरिसमधील अती उष्माचा त्रासाने ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला देखील हैराण केले. इटलीच्या मॅटेओ अर्नाल्डी विरुद्ध वैद्यकीय वेळ घेत त्सित्सिपासने कोर्टवरच उपचार करुन घेतले होते. त्याचा परिणाम माजी उपविजेत्या त्सित्सिपासच्या खेळावर झाला. दुसर्‍या फेरीत चार सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीत अर्नाल्डीने ७-६(७-२), ५-७, ६-३, ६-२ असा विजय मिळवून स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली.

याच गटातील अन्य लढतीत रशियाच्या आंद्र रुब्लेवने आपले आव्हान कायम राखले. लवचिकता आणि कौशल्यतेचे सुरेख प्रदर्शन करताना रुब्लेवने तिसर्‍या फेरीत पोर्तुगालच्या नुनो बोर्जेसचा ७-५, ७-६(७-२), ७-६(७-२) असा पराभव केला. तर, पाब्लो कारेनो बुस्टाने अर्जेन्टिनाच्या टिरांटेचा चार सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ७-६ (७-०), ७-५, ३-६, ६-४ असा पराभव केला. इटलीच्या माट्टेओ बेरेट्टिनी याने तिसरी फेरी गाठताना फ्रान्सच्या २२व्या मानांकित आर्थर रिंडरकेंचचा ६-४, ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.