पॅरिस : अग्रमानांकित आणि जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या गेलेल्या इटलीच्या यानिक सिन्नेरला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसर्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. यावेळी खराब खेळापेक्षाही उष्ण आणि दमट वातावरणाने तंदुरुस्तीवर झालेल्या परिणामाचा त्याला फटका बसला. बिगरमानांकित अर्जेंटिनाच्या जुआन मॅन्युएल सेरुंडोलोने त्याला पाच सेटच्या झुंजीत पराभूत केले.
सिन्नेरने सेरुंडोलोविरुद्ध अपेक्षित सुरुवात करताना पहिले दोन सेट जिंकले. तसेच तिसर्या सेटमध्ये तो ५-१ असा आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर उष्णतेमुळे त्याला त्रास जाणवायला लागला. त्याला थकवा जाणवला आणि पायात गोळे येण्यास (क्रॅम्प) सुरुवात झाली. त्याने सलग तीन गेम गमावले.
तिसर्या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी असताना सिन्नेरने वैद्यकीय विश्रांती मागून घेतली. तो ड्रेसिंग रूममध्येही परतला. नंतर तो कोर्टशेजारील बाकावर बराच वेळ बसून राहिला. मात्र, त्याने माघार घेण्यापेक्षा पुढे खेळणे सुरू ठेवले. परंतु शारीरिकदृष्ट्या तो संघर्ष करताना दिसला. याचा त्याच्या खेळावरही मोठा परिणाम झाला. अखेरीस सेरुंडोलोने ३-६, २-६, ७-५, ६-१, ६-१ असा अनपेक्षित विजय मिळवत तिसरा फेरी गाठली.
सिन्नेरचा पराभव आणि कार्लोस अल्कराझची अनुपस्थितीत यामुळे आता नोव्हाक जोकोविचला कारकीर्दीतील २५वे ग्रँडस्लॅम पटकावण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. तिसर्या मानांकित जोकोविचने दुसर्या फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या व्हॅलेंटिन रॉयरचा ६-३, ६-२, ६-७ (७-९), ६-३ असा पराभव केला. दुसर्या मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवने टोमास मॅकहाकला ६-४, ६-२, ६-२ असे नमवत आगेकूच केली.
रायबाकिनाचा पराभव
महिला एकेरीत दुसर्या मानांकित एलिना रायबाकिनालाही पराभवाचा धक्का बसला. युक्रेनच्या युलिया स्टारोडुत्सेवाने तिला ३-६, ६-१, ७-६ (१०-४) असे पराभूत केले. दुसरीकडे, सातव्या मानांकित एलिना स्वितोलिना आणि आठव्या मानांकित मीरा आंद्रीवाने मात्र आगेकूच कायम राखली.
३० फ्रेंच स्पर्धेच्या दुसर्या फेरीतील पराभवामुळे सिन्नेरची सलग ३० विजयांची मालिका खंडित झाली. तो फेब्रुवारीच्या मध्यापासून एकाही लढतीत पराभूत झाला नव्हता.
