वृत्तसंस्था, पॅरिस : स्पेनच्या राफेल नदालने फ्रान्सच्या कॉरेन्टिन मॉटेटला सरळ सेटमध्ये नमवून १४व्या फ्रेंच जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. तसेच दुसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव, कार्लोस अल्कराझ आणि कॅस्पर रूड यांनाही तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवण्यात यश आले. महिलांमध्ये पॉला बदोसा, एलिना रायबाकिना यांनी आगेकूच केली. आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत २१ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने मॉटेटला ६-३, ६-१, ६-४ अशा फरकाने पराभूत केले. बिगरमानांकित मॉटेटला नदालला फारशी झुंज देता आली नाही. आता तिसऱ्या फेरीत नदालपुढे हॉलंडच्या बोटिक व्हॅन डे झँडशूल्पचे आव्हान असेल. तसेच मेदवेदेवने सर्बियाच्या लास्लो देरेवर ६-३, ६-४, ६-३ अशी सरळ सेटमध्ये मात केली. याचप्रमाणे सहाव्या मानांकित १९ वर्षीय अल्कराझने पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या अल्बर्ट रामोस-व्हिनोलासला ६-१, ६-७ (७), ५-७, ७-६ (२), ६-४ असे नामोहरम केले. आठव्या मानांकित रूडने फिनलंडच्या एमिल रूसुवुओरीवर ६-३, ६-४, ६-२ अशी सरशी साधली.

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या तिसऱ्या मानांकित बदोसाने स्लोव्हेनियाच्या काया जुव्हानला तीन सेट रंगलेल्या सामन्यात ७-५, ३-६, ६-२ असे नमवले. रायबाकिनाने अमेरिकेच्या केटी व्होलिनेट्सचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. २०१७च्या फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाला मात्र बिगरमानांकित लिओलिया जिनजिनकडून २-६, २-६ अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला.

बोपण्णा-मिडलकूप उपउपांत्यपूर्व फेरीत

भारताच्या रोहन बोपण्णाने नेदरलँड्सच्या मॅटवे मिडलकूपच्या साथीने गुरुवारी आंद्रे गोलुबेव्ह आणि फॅब्रिके मार्टिन जोडीला नमवून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. एक तास आणि सहा मिनिटे चाललेला हा सामना बोपण्णा-मिडलकूप जोडीने ६-३, ६-४ अशा फरकाने जिंकला. परंतु रामकुमार रामनाथनचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. नील स्कूप्स्की आणि वेस्ले कूलहॉफ जोडीने रामकुमार आणि हंटर रीसी (अमेरिका) जोडीचा ६-३, ६-२ असा पाडाव केला.