लाल मातीवर दंतकथा सदृश अद्भुत वर्चस्व गाजवणाऱ्या राफेल नदालला चीतपट करण्याची ऐतिहासिक किमया नोव्हाक जोकोव्हिचने करून केली. नोव्हाक जोकोव्हिचने लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालवर ७-५, ६-३, ६-१ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवत इतिहास घडवला. नदालच्या वाढदिवस दिनीच त्याचे लाल मातीवरचे साम्राज्य संपुष्टात आणण्याचा पराक्रम जोकोव्हिचने केला.  
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित जोकोव्हिच आणि फ्रेंच खुल्या स्पर्धेची नऊ विक्रमी जेतेपदे आणि ७०-१ अशी अचंबित कामगिरी नावावर असलेला राफेल नदाल यांच्यातला हा मुकाबला म्हणजे उपांत्यपूर्व फेरीतच अंतिम लढतीचा थरार अनुभवण्यासारखे होते. मात्र गुडघे, खांदे आणि मनगट या दुखापतींनी वेढलेला नदाल जोकोव्हिचच्या सर्वसमावेशक खेळासमोर निष्प्रभ ठरला. २००९ मध्ये रॉबिन सॉडलिर्ंगविरुद्ध नदालचा चौथ्या फेरीत पराभव झाला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर नदाल या स्पर्धेत पराभूत झाला आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेत नदालविरुद्धच्या सात लढतींमधला जोकोव्हिचचा हा पहिलाच विजय आहे.
जोकोव्हिचने सर्व प्रकाराच्या कोर्टवर मिळून सलग २०व्या विजयाची नोंद केली. गेल्या काही महिन्यात सर्वच प्रकारच्या कोर्ट्सवर नदालच्या कामगिरीत घसरण झाली होती. यामुळेच यंदा त्याला सहावे मानांकन देण्यात आले होते. या पराभवामुळे जागतिक क्रमवारीत नदाल अव्वल दहाच्या बाहेर फेकला  जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्पर्धेची नऊ जेतेपदे नावावर असणाऱ्या नदालला एवढे नीचांकी मानांकन द्यावे का यावर उलटसुलट चर्चाही रंगल्या. मात्र जोकोव्हिचच्या विजयासह नदालला मिळालेली मानांकन योग्यच असल्याचे सिद्ध झाले आहे.उपांत्य फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला अँडी मरेशी होणार आहे.
६७ मिनिटांच्या मॅरेथॉन पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचने ४-० अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र चिवट खेळासाठी प्रसिद्ध नदालने ४-४ अशी बरोबरी केली. ही बरोबरी ५-५ अशी झाली. यानंतर अफलातून क्रॉसकोर्ट फटक्यांच्या बळावर जोकोव्हिचने सरशी साधली.
दुसऱ्या सेटमध्येही जोकोव्हिचने झंझावाती खेळ करत ५-३ अशी आगेकूच केली. नदालने तीन सेटपॉइंट वाचवत प्रतिकार केला मात्र चौथ्या पॉइंटवेळी जोकोव्हिचने बाजी मारली. १३ थेट विजयी फटक्यांसह जोकोव्हिचे सेटमध्ये प्रभुत्त्व राखले. फ्रेंच खुल्या स्पर्धेत सलग दोन सेट गमावण्याची नदालची ही पहिलीच वेळ होती.
झुंजार पुनरागमनासाठी प्रसिद्ध नदाल बाजी पालटवू शकतो याची जाणीव असलेल्या जोकोव्हिचने तिसऱ्या सेटमध्येही व्यावसायिक खेळ करत ४-० अशी आघाडी घेतली. पराभव अटळ दिसणाऱ्या नदालच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत जोकोव्हिचने तिसऱ्या सेटसह ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.  उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत अँडी मरेने डेव्हिड फेररला ७-६, ६-२, ५-७, ६-१ असे नमवत उपांत्य फेरी गाठली.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्सने दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित सेरेनाने सारा इराणीवर दणदणीत विजयासह  उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अपरिचित आणि नवख्या खेळाडूंमध्ये रंगलेल्या मुकाबल्यात तिमिआ बॅसिनझकीने अलिसन व्हॅन युटव्हॅनकला नमवत उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत फ्रान्सच्या जो विल्फ्रेड सोंगाने जपानच्या केई निशिकोरीवर मात करीत उपांत्य फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या आणि जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या सेरेनाने इटलीच्या सारा इराणीवर ६-१, ६-३ असा सहज विजय मिळवला. आधीच्या तीन फेऱ्यांमध्ये सेरेनाने पहिला सेट गमावला होता. मात्र या सामन्यात नेहमीच्या आक्रमक पवित्र्यासह खेळणाऱ्या सेरेनाने साराला कोणताही संधी न देता विजय मिळवला. दोन वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या सेरेनाची उपांत्य फेरीत तिमिआ बॅसिनझकीशी लढत होणार आहे. तिमिआने युटव्हॅनकचा ६-४, ७-५ असा पराभव केला.

भारताचे आव्हान संपले
*महिला दुहेरीत अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि तिची सहकारी मार्टिना हिंगिस जोडीला  उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
*बेथानी मॅटेक सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा जोडीने सानिया-हिंगिस जोडीवर ७-५, ६-२ अशी मात केली. सानियाच्या पराभवासह  भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले आहे.  
*लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांना पुरुष तसेच मिश्र दुहेरीत सलामीतच पराभव पत्करावा लागला.

Story img Loader