पॅरिस : भारताच्या दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. युवा खेळाडू लक्ष्य सेन, तसेच पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे या स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात आले.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने आठव्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानवर २१-१४, २१-१४ अशी सरळ गेममध्ये मात केली. बुसाननविरुद्ध सिंधूचा हा १५ सामन्यांत १४वा विजय ठरला. त्याआधी गुरुवारी रात्री उशिराने झालेल्या सामन्यात तिने डेन्मार्कच्या लिन ख्रिस्तोफरसनला २१-१९, २१-९ असे पराभूत केले होते. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असणाऱ्या सिंधूचा उपांत्य फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्ध सामना होईल. पुरुष एकेरीतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्यला दक्षिण कोरियाच्या हिओ वांगहिकडून १७-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये लक्ष्यने चांगली झुंज दिली, पण दुसऱ्या गेममध्ये त्याचा खेळ खालावला. पुरुष दुहेरीत, मलेशियन जोडी आरोन चाय आणि सोह वूइ यिकने पाचव्या मानांकित सात्विक आणि चिराग जोडीला १८-२१, २१-१८, २१-१७ असे पराभूत केले.