पॅरिस : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या अरिना सबालेन्काचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा अधुरेच राहिले. एक सेट आणि दोन ब्रेक्सची आघाडी घेऊनही तिला रशियाच्या डायना श्नायडरकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फ्रेंच स्पर्धेतील धक्कादायक निकालांची मालिका सुरू राहिली.

माजी विजेती इगा श्वीऑटेक आणि गतविजेती कोको गॉफ याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने सबालेन्काला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, तिला या संधीचा फायदा घेता आला नाही. पहिला सेट ६-३ असा जिंकल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये ती ४-१ अशी आघाडीवर होती. मात्र, त्यानंतर श्नायडरने पुनरागमन करताना सबालेन्काला धूळ चारली. श्नायडरने शेवटचे दोन सेट ७-५, ६-० असे जिंकत उपांत्य फेरी गाठली. तिची माया च्वालिन्स्का हिच्याशी गाठ पडणार आहे.

सबालेन्का, गॉफ, श्वीऑटेक यांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे यंदाच्या फ्रेंच स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या पाचपैकी एकही मानांकित खेळाडू दिसणार नाही. उपांत्य फेरीत आठवी मानांकित मीरा आंद्रिवा ही सर्वोच्च मानांकन मिळालेली खेळाडू आहे. कारकीर्दीत चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी सबालेन्का

फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धेत अद्याप विजेतेपदापर्यंत पोहचू शकलेली नाही.

सामन्याला कलाटणी

दुसर्‍या सेटमध्ये सबालेन्काने श्नायडरची स्व्हिहस दोन वेळा तोडत ४-१ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, श्नायडरने जिगरबाज खेळाचे दर्शन घडवताना सबालेन्काची स्व्हिहस भेदून सामन्यात पुनरागमन केले. स्वत:ची स्व्हिहस राखली आणि त्यानंतर आपल्या स्व्हिहसवर तीन ‘ब्रेक पॉइंट’ वाचवत श्नायडरने अनपेक्षितपणे सामन्यात बरोबरी केली. त्यानंतर सबालेन्काने आपली स्व्हिहस राखण्यात यश मिळविले. मात्र, तिच्या खेळातील लय गेली. दडपणाखाली तिच्याकडून चुका झाल्या आणि श्नायडरने दुसरा सेट जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये श्नायडरने अचूक खेळ केला, तर सबालेन्काला पुन्हा सूरच गवसला नाही. अखेरच्या सेटमध्ये तिला एकही गेम जिंकता आली नाही.

पात्रता फेरीतून च्वालिन्स्काची घोडदौड

* पात्रतेतून मुख्य फेरीत आलेल्या पोलंडच्या माया च्वालिन्स्काने यंदा फ्रेंच स्पर्धेत स्वप्नवत घोडदौड करत थेट उपांत्य फेरी गाठली.

* कारकीर्दीत ती प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. च्वालिन्स्काने ॲना कालिनस्काया हिचा ७-६ (७-३), ६-३ असा पराभव केला.

* पात्रता फेरीतून फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी च्वालिन्स्का ही २०२० नंतर दुसरीच खेळाडू ठरली आहे. तेव्हा नादिया पोडोरोस्का हिने अशी कामगिरी केली होती.