पॅरिस : भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) विजयी सलामी दिली. सायना नेहवालला मात्र दुखापतीमुळे पहिल्या फेरीच्या लढतीतून अध्र्यातच माघार घेतली.

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूने महिला एकेरीत डेन्मार्कच्या जुली दवाल याकोबसनला २१-१५, २१-१८ असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित सिंधूचा दुसऱ्या फेरीत लिन ख्रिस्तोफरसनशी सामना होईल. सायनाने जपानच्या सायाका ताकाहाशीविरुद्ध ११-२१, २-९ असे पिछाडीवर पडल्यानंतर दुखापतीमुळे सामना अध्र्यात सोडला. मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीने मॅथियस थ्यरी आणि माई सुरोला २१-१९, २१-१५ असे पराभूत केले.

पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने आर्यलडच्या एनहात एनग्वेनवर २१-१०, २१-१६ अशी मात केली. किदम्बी श्रीकांतला अग्रमानांकित केंटो मामोटाविरुद्ध २१-१८, २०-२२, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉयचे आव्हानही संपुष्टात आले.