पॅरिस : वयाच्या ३९व्या वर्षीही नोव्हाक जोकोविच याने आपल्यापेक्षा अध्र्या वयाच्या खेळाडूवर प्रेक्षकांची शेरेबाजी झुगारुन मात करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. विक्रमी ८२व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळताना जोकोविचला पहिल्या फेरीत संघर्ष करावा लागला, पण पहिला सेट गमावल्यानंतर खेळ उंचावून त्याने बाजी मारली.
जोकोविचने २२ वर्षीय स्थानिक खेळाडू जिओव्हानी एम्पेटशी पेरीकार्ड याचा ५-७, ७-५, ६-१, ६-४ असा पराभव केला. जवळपास तीन तास चाललेल्या या लढतीनंतर जोकोविचने फ्रेंच स्पर्धेत यजमान देशाच्या खेळाडूविरुद्ध खेळणे केव्हाही कठीण, असे सांगितले. ‘‘फ्रान्सचा खेळाडू खेळत असताना प्रेक्षक या सामन्यात पूर्ण गुंतून जातात आणि प्रतिस्पध्र्यावर दडपण निर्माण करतात. अशा प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवला याचा आनंद आहे,’’ असे जोकोविच म्हणाला.
रात्री उशीरा झालेल्या सामन्यात दीर्घ रॅलीज अनेकदा बघायला मिळाल्या. पहिला सेट गमाविल्यानंतर आणि १ तास ४५ मिनिटांच्या झुंजीनंतर जोकोविचला ६ फूट ७ इंच इतक्या उंचपुर्या जिओव्हानी पेरीकार्ड याची स्व्हिहस भेदण्याची संधी मिळाली. यामुळे तो सेटची बरोबरी करू शकला.
दरम्यान, महिला एकेरीत चार वेळच्या विजेत्या इगा श्वीऑटेक हिने विजयी सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाच्या इमर्सन जोन्स हिचा ६-१, ६-२ असा फडशा पाडला. जॅस्मिन पाओलिनी हिने डायना यस्टेम्सका हिचा ७-५, ६-३ असा, तर एलिना रायबाकिना हिने व्हेरोनिका इयावेच हिचा ६-२, ६-१ असा पराभव करत आगेकूच केली.
जोकोविचने विक्रमी ८२व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होताना रॉजर फेडरर आणि फेलिसियानो लोपेझ यांना मागे टाकले. त्याने विक्रमी २४ वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले आहे. फ्रेंच स्पर्धेत तो २२व्यांदा खेळत असून, यात १९ वेळा त्याने किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. तीन वेळा (२०१६, २०२१, २०२३) तो विजेता ठरला आहे.
वावरिंका पराभूत
पुरुष एकेरीत ४१ वर्षीय स्टॅनिस्लास वावरिंकाला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. ही त्याची अखेरची फ्रेंच स्पर्धा होती. नेदरलँड्सच्या जॅस्पर डियॉन्गने वावरिंकाला ६-३, ३-६, ६-३, ६-४ असे पराभूत केले. ३६ वर्षीय मार्को ट्रुंगेलिटी प्रथमच पहिल्या शंभरात दाखल झाला असून, त्याने किरियान जॅकेटचा ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला.
