पॅरिस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष विभागापाठोपाठ आता महिला विभागातही मानांकितांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. गतविजेत्या कोको गॉफला तिसर्‍या, तर चार वेळच्या विजेत्या इगा श्वीऑटेकला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता फ्रेंच स्पर्धेतील एकाही माजी विजेतीचे आव्हान शाबूत राहिलेले नाही.

ऑस्ट्रियाच्या ॲनास्तासिया पोटापोव्हाने गॉफ, तर युक्रेनच्या मार्टा कोस्च्युकने श्वीऑटेकचे आव्हान संपुष्टात आणले. यंदाच्या हंगामात क्ले कोर्टवर अजिंक्य राहिलेल्या कोस्च्यूकने आपल्या खेळातील सातत्य कायम राखताना श्वीऑटेकचा ७-५, ६-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पोटापोव्हाने गॉफवर ४-६,

७-६ (७-१), ६-४ अशी मात करत चौथी फेरी गाठली.

याच स्पर्धेत २०२४ मध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर श्वीऑटेक अद्याप कुठल्याच क्ले कोर्टवरील स्पर्धेत जिंकू शकलेली नाही. या वेळी श्वीऑटेकला २५व्या वाढदिवशीच पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे कोस्च्यूक आतापर्यंत झालेल्या तीनही लढतीत श्वीऑटेककडून पराभूत झाली होती. मात्र, यावेळी तिने अप्रतिम खेळ केला. कोस्च्यूकने यंदा क्ले कोर्टवर सलग १६वा सामना जिंकला. दरम्यान, रविवारी खेळाडूंना उष्म्यापासून दिलासा मिळाला. पॅरिसमध्ये दुपारपासून तापमान २१ अंशापर्यंत खाली घसरले होते.