वृत्तसंस्था, पॅरिस: ॲना कालिनस्कायाने सोमवारी ऑ्ट्रिरयाच्या अनास्तासिया पोटापोव्हाची स्वप्नवत घोडदौड रोखून फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कालिनस्कायाने ६-४, २-६, ७-६ (१०-७) अशी बाजी मारली. पुरुष एकेरीत कॅस्पर रुडचे आव्हान संपुष्टात आले, तर जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या ॲलेक्झांडर झ्वेरेवने आगेकूच केली.

कालिनस्काया आणि पोटापोव्हा यांच्यातील चुरशीने खेळला गेलेला सामना जवळपास तीन तास चालला. तिसर्‍या फेरीत चार वेळच्या
विजेत्या इगा श्वीऑटेकचे आव्हान संपुष्टात आणणार्‍या पोटापोव्हाला निर्णायक सेटमध्ये दोनदा सामना जिंकवून देणारी स्व्हिहस राखण्यात अपयश आले.

त्यानंतर झालेल्या ‘सुपर टायब्रेक’मध्ये कालिनस्कायाने १-४ अशा पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत २२व्या स्थानावर असलेल्या कालिनस्कायाची ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी तिने २०२४च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.

नोव्हाक जोकोविचला पराभूत करणार्‍या ब्राझीलच्या १९ वर्षीय जोओ फॉन्सेकाने देखील कारकीर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रेंच स्पर्धेत दोन वेळा उपविजेत्या राहिलेल्या कॅस्पर रुडचा ७-५, ७-६ (१०-८), ५-७, ६-२ असा पराभव केला.

झ्वेरेवने फ्रान्सच्या जेस्पर डी यॉन्गचे आव्हान ७-६ (७-३), ६-४, ६-१ असे संपुष्टात आणले. स्पेनच्या राफेल जोदारने आपल्याच देशाच्या पाब्लो कॅरोनो बुस्टाचा ४-६, ४-६, ६-१, ६-२, ६-२ असा पराभव करून प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.