पॅरिस : रशियाच्या १९ वर्षीय मीरा आंद्रीवा आणि युक्रेनच्या मार्टा कोस्च्यूक यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर याच गटात अग्रमानांकित अरिना सबालेन्काने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

यंदाच्या हंगामात क्ले कोर्टवर अपराजित असलेल्या कोस्च्यूकने आपलीच देशवासीय एलिना स्वितोलिनाचे आव्हान ६-३, २-६, ६-२ असे संपुष्टात आणले. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी कोस्च्यूक ही पहिली युक्रेनची खेळाडू ठरली. तर अन्य उपांत्यपूर्व सामन्यात आंद्रीवाने रोमानियाच्या सोराना कर्स्टेआचा ६-०, ६-३ असा सहज पराभव केला.

कोस्च्यूक यंदाच्या हंगामात क्ले कोर्टवर कमालीची यशस्वी ठरली आहे. आतापर्यंत कोस्च्यूकने सलग सतरा सामने जिंकले आहेत. उपांत्य फेरीत तिची गाठ मीरा आंद्रीवाशी पडणार आहे. विशेष म्हणजे याच वर्षी माद्रिद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोस्च्यूकने आंद्रीवाचाच पराभव करून विजेतेपद मिळविले होते.

कोस्च्यूकने उपांत्यपूर्व लढतीत सुरुवातीलाच स्वितोलिनावर ४-१ अशी आघाडी घेतली होती. प्रेक्षकांची कमी उपस्थिती राहिलेल्या या सामन्यात स्वितोलिनाने ब्रेकची संधी साधून फरक कमी केला. मात्र कोस्च्यूकच्या झंझावातासमोर ती टिकू शकली नाही. कोस्च्यूकने पहिला सेट सहज जिंकला. दुसर्‍या सेटला कोस्च्यूकला तिच्या स्व्हिहसने साथ दिली नाही. याचा फायदा उठवून स्वितोलिनाने आक्रमक खेळ करत दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्ये दोघींमध्ये कमालीची तीव्रता दिसून आली नाही. पहिल्या पाच गेमपर्यंत दोघींना आपापली स्व्हिहस राखता आली नाही. अखेरीस सहाव्या गेमला कोस्च्यूकने पुन्हा ब्रेकची संधी साधत ४-२ अशी मोठी आघाडी घेतली आणि पुढे जाऊन आणखी एकदा स्व्हिहस ब्रेक करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

युक्रेनच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या या सामन्याला भावनिक किनार होती. युद्धजन्य परिस्थितीत असलेल्या युक्रेनवर सोमवारी रशियाने नव्याने केलेल्या हल्ल्यात १८ लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे विजयानंतर कोस्च्यूकने हा सामना देशाला समर्पित केला. ‘‘युक्रेनमध्ये विशेषत: कीवमध्ये आमची रात्र पुन्हा एकदा खूप कठीण होती. अनेक लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे मला हा सामना युक्रेनच्या जनतेला समर्पित करायचा आहे, असे कोस्च्यूकने सांगितले.

कोको गॉफ आणि इगा श्वीऑटेक यांच्या पराभवाने विजेतेपदाच्या शर्यतीत अधिक पसंती असलेल्या कोस्च्यूकपाठोपाठ आंद्रीवानेदेखील आपल्या आक्रमकतेचे सर्वोत्तम प्रदर्शन केले. कर्स्टेआचा अगदी सहज पराभव करताना आंद्रिवाने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. वेगवान स्व्हिहस आणि ताकदवान फोरहँडच्या फटक्यांनी आंद्रीवाने संपूर्ण लढतीत कर्स्टेआला आपला खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही.

महिला गटाच्या अन्य सामन्यात अग्रमानांकित सबालेन्काने जपानच्या नाओमी ओसाकावर

७-५, ६-३ अशी मात केली. सबालेन्काने आपल्या अचूक स्व्हिहस आणि बदललेल्या रणनीतीच्या जोरावर ओसाकाला निष्प्रभ ठरवले. सबालेन्काने स्व्हिहसवर पूर्ण वर्चस्व राखताना १२ बिनतोड स्व्हिहस केल्या. आपल्या नेहमीच्या ताकदवान फटक्यांना मुरड घालून सबालेन्काने या वेळी ड्रॉप शॉट्सवर भर दिला. नेटवर येऊन खेळण्याचा सबालेन्काचा निर्णयही कमालीचा यशस्वी ठरला. त्यामुळेच पहिल्या सेटमध्ये ओसाकाने लढत दिल्यानंतरही सबालेन्काला सहज विजय मिळविणे शक्य झाले.

ॲलेक्झांडर झ्वेरेवची चमक

संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत आता आघाडीवर असलेल्या जर्मनीच्या दुसरा मानांकित ॲलेक्झांडर झ्वेरेवने स्पेनच्या युवा राफेल जोदारचा ७-६ (७-३), ६-१, ६-३ असा पराभव करुन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत झगडावे लागल्यानंतर सलग दोन्ही सेट झ्वेरेवने सहज जिंकले. दुसर्‍या व तिसर्‍या सेटमध्ये झ्वेरेवने एकतर्फी खेळ करीत जोदारला पुनरागमनाची कोणतीच संधी दिली नाही. ‘‘समोर येणारी प्रत्येक लढत जिंकणे हे माझे उद्दिष्ट आणि ध्येय आहे. यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार,’’ असे झ्वेरेव म्हणाला.