French Open Tennis Tournament पॅरिस : महिलांमध्ये तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या जेसिका पेगुला आणि पुरुषांमध्ये सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्ह यांना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का आणि सहाव्या मानांकित कोको गॉफने, तर पुरुषांमध्ये नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झ आणि २२व्या मानंकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी मात्र विजयी घोडदौड कायम राखली. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पेगुला २८व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सकडून पराभूत झाली. मर्टेन्सने ही लढत ६-१, ६-३ अशी सहज जिंकली. पेगुलाने गेल्या पाचपैकी चार ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठला आहे. मात्र, फ्रेंच स्पर्धेत तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पेगुलाची अमेरिकन सहकारी गॉफला मात्र विजय मिळवण्यात यश आले. गॉफने ऑस्ट्रियाच्या जुलिया ग्राबहेरचा ६-२, ६-३ असा पराभव केला. तसेच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार सबालेन्काने बिगरमानांकित कॅमिला राखिमोव्हाला ६-२, ६-२ असे नमवले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रुब्लेव्हला संघर्षपूर्ण लढतीअंती पराभवाचा सामना करावा लागला. इटलीच्या लोरेन्झो सोनेगोने दोन गेमची पिछाडी भरुन काढताना रुब्लेव्हवर ५-७, ०-६, ६-३, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. रुब्लेव्हला यंदा जेतेपदाची संधी होती, पण त्याने निराशा केली. फ्रिट्झने चांगली कामगिरी करताना फ्रान्सच्या आर्थर रिन्डेरनेकला २-६, ६-४, ६-३, ६-४ असे पराभूत केले. तसेच जर्मनीच्या झ्वेरेव्हने अॅलेक्स मोकॅनला ६-४, ६-२, ६-१ असे नमवत तिसरी फेरी गाठली.(आंद्रे रुब्लेव्ह)