संकेत कुलकर्णी

पुणे : दुखापतीमुळे राफेल नदाल फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच जेतेपदाचा दावेदार असल्याचे मत भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मनने व्यक्त केले. ‘‘मातीच्या कोर्टवर नदालचे वर्चस्व कायम असते. परंतु त्याला २०२१ मध्ये बऱ्याच दुखापतींना सामोरे जावे लागले. त्यातून सावरत त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत आपला खेळ उंचावला. पण रोममध्ये त्याला पुन्हा दुखापत झाली. वयामुळे अशा दुखापतींचे आव्हान सोपे नसेल. पण लढवय्या नदाल यातून नक्की सावरेल. पण तो या स्पर्धेत खेळू शकला नाही तर जोकोव्हिचच ही स्पर्धा जिंकू शकतो,’’ असे सोमदेवने सांगितले.

‘‘जोकोव्हिच यंदाच्या वर्षी जरी कमी सामने खेळला असला तरी त्याने रोममधील इटली खुली स्पर्धा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियात तो जरी खेळू शकला नसला, तरी त्याने जोरदार पुनरागमन केले आहे. पण तरीदेखील जोकोव्हिचसारख्या मोठय़ा खेळाडूंना कार्लोस अल्काराझ आणि डेनिस शापोव्हालोव हे तरुण खेळाडू धक्का देऊ शकतात,’’ असे मत सोमदेवने व्यक्त केले आहे. ‘‘भारताचे राजीव राम, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा, युकी भांब्री हे खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे,’’ असे सोमदेवने सांगितले.