पॅरिस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत गुरुवारी धक्कादायक निकालांची नोंद झाली. कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि डॅनिएले कॉलिन्स या अनुक्रमे आठव्या आणि नवव्या मानांकित खेळाडूंसह दोन ग्रँडस्लॅम विजेत्या सिमोना हालेपचे आव्हान संपुष्टात आले. पुरुषांमध्ये डॅनिल मेदवेदेव आणि राफेल नदाल, तर महिलांमध्ये अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक यांना मात्र तिसरी फेरी गाठण्यात यश आले.

चेक प्रजासत्ताकच्या प्लिस्कोव्हाने बिगरमानांकित लिओलिया जिनजिनकडून २-६, २-६ अशा फरकाने पराभव पत्करला. चीनच्या १९ वर्षीय क्विन्वेन झेंगने माजी विजेत्या हालेपला २-६, ६-२, ६-१ असे पराभूत केले. तसेच  बिगरमानांकित शेल्बी रॉजर्सने कॉलिन्सला ६-४, ६-३ अशी धूळ चारली. श्वीऑनटेकने अमेरिकेच्या अ‍ॅलिसन रिस्केचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला.      

पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मेदवेदेवने सर्बियाच्या लास्लो देरेवर ६-३, ६-४, ६-३ अशी मात केली. २१ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने कॉरेंटीन मॉटेटला ६-३, ६-१, ६-४ असे पराभूत केले. सहाव्या मानांकित कार्लोस अल्कराझने मॅरेथॉन लढतीत स्पेनच्या अल्बर्ट रामोस-व्हिनोलासला ६-१, ६-७ (७), ५-७, ७-६ (२), ६-४ असे हरवले.

बोपण्णा, मिर्झाची आगेकूच

भारताच्या रोहन बोपण्णाने मॅटवे मिडलकूपच्या साथीने आंद्रे गोलुबेव्ह व फॅब्रिके मार्टिन जोडीला ६-३, ६-४ असे नमवले. परंतु रामकुमार रामनाथनचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि लुसी हरादेकाने जॅस्मिन पाओलिनी आणि मार्टिना त्रेविसानला ४-६, ६-२, ६-१ असे नमवत दुसरी फेरी गाठली.