फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदाल सत्ता राखणार?

नदालने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आपल्या नावावर केले असून त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून सुरुवात

‘लाल मातीचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विक्रमी १३वे जेतेपद पटकावले होते. रविवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नदाल पुन्हा सत्ता राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नदालने २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आपल्या नावावर केले असून त्याने रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. आता यंदा पुन्हा एकदा जेतेपद पटकावून सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदे आपल्या नावावर करण्याची संधी नदालला मिळणार आहे. पण नदालच्या मार्गात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि फेडरर यांचा प्रमुख अडथळा असणार आहे. हे तिघेही यंदा एकाच गटात असल्यामुळे नदालला उपांत्य फेरीत जोकोव्हिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

चाहत्यांना संधी

गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावानंतरही एक हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची संधी देण्यात आली होती. यंदा ३० मे ते ८ जूनदरम्यान प्रत्येक दिवशी ५३८८ चाहते उपस्थित असतील. त्यानंतर ९ जूनपासून बाद फेरीच्या टप्प्याला सुरुवात होत असून चाहत्यांची संख्या १३,१४६ इतकी वाढवण्यात आली आहे. मात्र स्टेडियममध्ये उपस्थित राहण्यासाठी चाहत्यांकडे करोनाचा नकारात्मक अहवाल असणे किंवा पूर्ण लसीकरण करणे बंधनकारक आहे.

श्वीऑनटेकसमोर बार्टी, ओसाकाचे आव्हान

पोलंडची युवा खेळाडू इगा श्वीऑनटेकने गेल्या वर्षी दमदार कामगिरीसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यंदा मात्र जेतेपद कायम राखण्यासाठी तिला २०१९ची विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली अ‍ॅश्ले बार्टी तसेच जपानची नाओमी ओसाका यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सध्या क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या श्वीऑनटेकने गेल्या महिन्यात इटालियन खुली स्पर्धा जिंकल्याने या स्पर्धेच्या जेतेपदासाठी ती प्रबळ दावेदार मानली जात आहे. गेल्या वर्षी बार्टीने करोनामुळे या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. पण १३ महिन्यांनंतर तिचे पुनरागमन होत असून तिला दुखापतीचीही चिंता सतावत आहे. जपानच्या दुसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाला लाल मातीवर फारशी चमकदार कामगिरी करता आली नसली तरी आपल्या खात्यात पाचव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची भर घालण्यासाठी ती उत्सुक आहे.

वेळ : दुपारी २.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: French open tennis tournament starts today akp

ताज्या बातम्या