वृत्तसंस्था, पॅरिस : अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच आणि राफेल नदाल या तारांकित खेळाडूंनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच पुरुषांमध्ये स्टेफानोस त्सित्सिपास, आंद्रे रुब्लेव्ह आणि दिएगो श्वाट्झमन, तर महिलांमध्ये कोको गॉफ आणि लैला फर्नाडेझ यांनाही आगेकूच करण्यात यश आले.

गतविजेत्या जोकोव्हिचने पुरुष एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या लढतीत स्लोव्हेनियाच्या अल्जाझ बेदेनेवर ६-३, ६-३, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. पुढील फेरीत त्याच्यापुढे अर्जेटिनाच्या श्वाट्झमनचे आव्हान असेल. श्वाट्झमनने तिसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हचा ६-३, ६-१, ६-२ असा पराभव केला.

त्याचप्रमाणे विक्रमी २१ ग्रँडस्लॅम विजेत्या नदालने नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डे झँडशूल्पला ६-३, ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पुढील फेरीत त्याचा कॅनडाच्या नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमेशी सामना होईल. त्याआधी चौथ्या मानांकित त्सित्सिपासने दुसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या झदेनेक कोलेरवर ६-३, ७-६ (१०-८), ६-७ (३-७), ७-६ (९-७) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. सातव्या मानांकित रुब्लेव्हने अर्जेटिनाच्या फेडेरिको देल्बोनिसला ६-३, ३-६, ६-२, ६-३ असे नमवले.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत १८व्या मानांकित गॉफने काया कॅनेपीला ६-३, ६-४ असे पराभूत केले. पुढील फेरीत तिचा ३१व्या मानांकित एलिस मेर्टेन्सशी सामना होईल. मेर्टेन्सने व्हाव्‍‌र्हरा ग्राचेव्हाचा ६-२, ६-३ असा पराभव केला. गेल्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या लैला फर्नाडेझने स्वित्र्झलडच्या १४व्या मानांकित बेलिंडा बेंचिचवर ७-५, ३-६, ७-५ अशी मात केली. १३व्या मानांकित एलेना ओस्तापेंकोला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. फ्रान्सच्या एलिझ कॉर्नेने तिला ६-०, १-६, ६-३ असे नमवले.

बेगूने रागाच्या भरात आपटलेली रॅकेट प्रेक्षागृहात

रोमेनियाची ३१ वर्षीय खेळाडू इरिना-कॅमेलिया बेगूला फ्रेंच स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात राग अनावर झाला. महिला एकेरीत एकॅटरिना अ‍ॅलेक्सांड्रोव्हाविरुद्ध दुसऱ्या सेटमध्ये ती ०-२ अशी पिछाडीवर होती. त्यानंतर आपल्याच खेळावर नाराज बेगूने रागाच्या भरात आपली रॅकेट मातीच्या कोर्टवर आपटली. रॅकेट तिच्या हातातून सुटून थेट पंचांच्या मागे बसलेल्या प्रेक्षकांमध्ये गेली आणि एका मुलाच्या चेहऱ्याला लागली. त्यामुळे खेळ पाच मिनिटांकरता थांबवण्यात आला. या दरम्यान ग्रँडस्लॅम पर्यवेक्षकांनी आधी पंच, मग प्रेक्षक आणि दोन्ही खेळाडूंशी संवाद साधला. त्यानंतर बेगूला ताकीद देत पुढे खेळत राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, तिने हा सामना ७-६ (७-३), ३-६, ४-६ असा गमावला.