एपी, पॅरिस : गतउपविजेत्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निसटत्या विजयाची नोंद केली. तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसऱ्या मानांकित अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी आपापल्या दुसऱ्या फेरीतील लढतीत विजय मिळवले. महिला एकेरीत अरिना सबालेंका, व्हिक्टोरिया अझरेंका यांना आगेकूच करण्यात यश आले. अमेरिकन खुल्या स्पर्धेतील गतविजेत्या एमा रॅडूकानूचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील चुरशीच्या लढतीत चौथ्या मानांकित त्सित्सिपासने इटलीच्या लोरेंझो मुसेट्टीला ५-७, ४-६, ६-२, ६-३, ६-२ असे पराभूत केले. हा सामना तीन तास ३४ मिनिटे चालला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अग्रमानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलेक्स मोलकानवर ६-२, ६-३, ७-६ (७-४) असा विजय मिळवला. सामन्यातील पहिले दोन सेट जोकोव्हिचने सहज जिंकले. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये मोलकानने त्याला आव्हान दिले.

गेल्या पर्वात उपांत्य फेरी गाठणाऱ्या झ्वेरेव्हने पिछाडीवरुन मुसंडी मारत तब्बल ३ तास ३६ मिनिटे चाललेल्या लढतीत अर्जेटिनाच्या सेबॅस्टियन बाएजला २-६, ४-६, ६-१, ६-२, ७-५ असे पराभूत करत पुढची फेरी गाठली. तसेच कॅनडाच्या नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमेने अर्जेटिनाच्या कॅमिलो उगो काराबेलीला ६-०, ६-३, ६-४ असे नमवले. 

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत दोन वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची विजेती आणि १५व्या मानांकित अझरेंकाने जर्मनीच्या आंद्रेया पेट्कोव्हिचला ६-१, ७-६ (७-३) असे सरळ सेटमध्ये नमवत आगेकूच केली. तर जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने फ्रान्सच्या एल्सा जॅक्वेमोटला ६-१, ७-६ (७-२) अशा फरकाने नामोहरम केले. रोमेनियाच्या सिमोना हालेपने जर्मनीच्या नस्ताया शंकला ६-४, १-६, ६-१ असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. सातव्या मानांकित सबालेंकाने क्लोइ पॅक्वेला २-६, ६-३, ६-४ असे नमवले. परंतु ब्रिटनच्या रॅडूकानूला सान्सोव्हिचकडून ६-३, १-६, १-६ अशी हार पत्करावी लागली.

रामनाथन-रीसची विजयी सुरुवात

भारताचा रामकुमार रामनाथन आणि त्याचा अमेरिकन साथीदार हंटर रीस यांनी पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या डॅनिएल अल्टमायर आणि ऑस्कर ओट्टे जोडीला ७-६ (७-४), ६-३ असे नमवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रामनाथन-रीस जोडीने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकत आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये या जोडीने जर्मनीच्या जोडीला पुनरागमन करण्याची संधी न देता सामन्यात विजय नोंदवला.