‘‘क्लेकोर्टवर  होणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिलांच्या दुहेरीत विजेतेपद हे अधिक आव्हानात्मक आहे,’’ असे भारताची सर्वोत्तम खेळाडू सानिया मिर्झाने सांगितले. सानिया व मार्टिना िहगिस यांनी सलग तीन ग्रँड स्लॅम स्पर्धामधील दुहेरीत अजिंक्यपद मिळविले आहे. पॅरिस येथे मे महिन्यात होणाऱ्या फ्रेंच स्पर्धेतही तशीच कामगिरी करण्यासाठी ही जोडी उत्सुक आहे.

सानिया म्हणाली,‘‘ यंदा या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी आम्हाला चांगली संधी आहे. आम्ही सलग तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. खरं तर क्ले कोर्ट हे आमचे आवडते मैदान नाही. मात्र गेल्या दीड वर्षांत आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे व आमच्यामध्ये चांगला समन्वयही आहे. त्याचा फायदा घेत आम्ही विजेतेपद मिळविण्यासाठी प्रयत्न करू.’’

सानिया व मार्टिना यांची सलग ४१ सामन्यांची  विजयाची मालिका नुकतीच कतार ओपन स्पर्धेत संपुष्टात आली. रशियाच्या एलिना व्हेसनिना व दारिया कसात्किना यांनी त्यांच्यावर मात करीत उपांत्य फेरी गाठली होती.