माद्रिद : फ्रान्सचा आघाडीचा फुटबॉलपटू करिम बेन्झिमा स्पेनच्या आघाडीच्या क्लबमध्ये सहभागी असलेल्या रेयाल माद्रिदचे पुढील हंगामापासून प्रतिनिधित्व करणार नाही. रविवारी रेयाल माद्रिदने या आघाडीपटूसोबतचा करार पुढे वाढवला नाही. जवळपास १४ वर्षे रेयाल माद्रिदकडून खेळणारा बेन्झिमा सौदी अरेबियाचा क्लब अल इतिहादकडून खेळण्याची शक्यता आहे. त्या संघासोबत ८ अब्ज रुपयाहून अधिक (१०० मिलियन युरो) करार करणार असल्याची चर्चाही समोर येत आहे.
हा हंगाम बेन्झिमासाठी फारसा चांगला राहिलेला नाही. त्याला दुखापतीमुळे कतार येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या राष्ट्रीय संघात सहभाग नोंदवता आला नाही. बेन्झिमा आणखी एक हंगाम संघासोबत राहील असे वाटत होते. मात्र, सौदी अरेबियाच्या क्लबने दिलेल्या प्रस्तावामुळे त्याला निर्णय बदलण्यास भाग पाडले असल्याची चर्चा आहे. ‘‘रेयाल माद्रिद क्लब आणि आमचा कर्णधार करिम बेन्झिमा यांनी एक चांगली आणि अविस्मरणीय भागिदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कारकीर्द ही चांगली वागणूक, व्यावसायिक दृष्टिकोन आणि क्लबप्रति असलेला आदर यांचे चांगले उदाहरण आहे. त्यामुळे बेन्झिमा स्वत:च्या भविष्याचा निर्णय करण्यात समर्थ आहे,’’ असे रेयाल माद्रिदने आपल्या निवेदनात म्हटले आहे.




बेन्झिमा अल इतिहाद संघात सहभागी झाला, तर रेयाल माद्रिदचा त्याचा माजी सहकारी ख्रिस्तिआनो रोनाल्डोविरुद्ध खेळू शकतो. रोनाल्डोनेही सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसह करार केला आहे.
बेन्झिमा २००९ पासून रेयाल माद्रिद संघाकडून खेळत आहे. तो संघात आल्याने संघाची आक्रमक फळी आणखी भक्कम झाली. २०१८मध्ये रोनाल्डो युव्हेंटसला गेल्यानंतर बेन्झिमा संघासाठी गोल करणारा निर्णायक खेळाडू ठरला. ३५० हून अधिक गोल झळकावणाऱ्या बेन्झिमाने माद्रिदच्या अनेक जेतेपदात योगदान दिले. २०२१-२०२२ हंगामात बेन्झिमाने सर्व स्पर्धात मिळून एकूण ४४ गोल झळकावले. आपल्या कारकीर्दीदरम्यान क्लबने २५ जेतेपद मिळवले. ज्यामध्ये पाच युरोपियन चषक, चार ला लिगा आणि तीन कोपा डेल रे जेतेपदाचा समावेश आहे.