विंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड शुक्रवारी होणार आहे. ३ ऑग्सटपासून सुरू होणाऱ्या विंडिज दौऱ्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद भारतीय संघाची निवड करणार आहेत. विंडिज दौऱ्यात संघातील अनेक दिग्गज खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार,कार्तिक, केदार जाधव यांना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे

सुत्रांच्या माहितीनुसार, दीपक चाहर, खलील अहमद, नवदीप सैनी आणि आवेश खान यांच्या नावाचा बीसीसीआय विचार करत आहे. चाहरने आयपीएलमध्ये २२ विकेट घेतल्या होत्या. तर खलील अहमदने १९ विकेट घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाजीमध्ये राहुल चहर आणि मयंक मार्कंडेचा विचार केला जाऊ शकतो.

फलंदाजीमध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. विंडिजमध्ये सुरू असलेल्या भारत अ संघाकडून अय्यरने चांगले प्रदर्शन केलं आहे. गिलने आयपीएलमध्ये २९६ धावा केल्या आहेत.

२२ ऑगस्टपासून भारत आणि विडिंजमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहलीला संपूर्ण विंडिज दौऱ्यात आराम दिल्यास कसोटीमध्ये अजिंक्य रहाणे आणि एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल.