IND vs ENG : दिवंगत मित्रासाठी खरेदी केलं क्रिकेटच्या मॅचचं तिकिट अन्…

मैदानातील ती रिकामी खूर्ची ठरली चर्चेचा विषय

Friends reserve an empty seat for a deceased who never missed a match in 40 years
जॉन क्लार्क यांची खुर्ची

नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर भारत आणि इंग्लंड या संघात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात चाहत्यांनाही प्रवेश देण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये क्रिकेट लोकप्रिय असल्याने चाहत्यांनीही या सामन्यासाठी गर्दी केलीय. सामना सुरू झाल्यानंतर जॉन क्लार्क नावाचे चाहते ट्विटवर ट्रेंड होऊ लागले.

या सामन्यासाठी जॉन क्लार्कच्या नावाने तिकीट खरेदी करण्यात आलेले आहे. मात्र त्यांची जागा असलेल्या खुर्चीवर कोणीही बसलेले नाही. खरे तर जॉन आज हयात नाहीत. गेल्या ४० वर्षांपासून जॉन यांनी ट्रेंट ब्रिजमध्ये होणारी एकही कसोटी चुकवली नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर जॉन यांचे मित्र त्यांच्या नावाने ट्रेंट ब्रिजमधील प्रत्येक सामन्याचे तिकीट खरेदी करतात आणि त्यांची खुर्ची रिकामी ठेवतात.

 

 

 

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हाच निर्णय त्याच्या अंगउलट आला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला आहे. कर्णधार जो रूट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ बळी तर शमीने ३ बळी घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.

पहिल्या डावात इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले

इंग्लंडकडून रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉले यांनी सलामी दिली. भारताचा तेजतर्रार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. बर्न्सला बुमराहने शून्यावर पायचित पकडले. बर्न्सने पाच चेंडू खेळले, पण त्याला एकही धाव घेता आली नाही. बर्न्सनंतर झॅक क्रॉले मैदानात आला. तो स्थिरावला असताना मोहम्मद सिराजने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. क्रॉलेने ४ चौकारांसह २७ धावा केल्या.

उपाहारानंतर डॉमिनिक सिब्ले वैयक्तिक १८ धावांवर माघारी परतला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर  जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या डावाला आधार दिला. या दोघांनी ७२ धावांची भागीदारी रचली. चहापानापर्यंत जो रूटने आपले अर्धशतक पूर्ण केले. तर  शमीच्या गोलंदाजीवर बेअरस्टो माघारी परतला. त्याने २९ धावा केल्या.

चहापानानंतर इंग्लंडची एक बाजू सांभाळणारा रूट माघारी परतला. रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. मुंबईकर गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला पायचित पकडले. त्यानंतर एका बाजूने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. सॅम करनने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २७ धावांची आतषबाजी खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Friends reserve an empty seat for a deceased who never missed a match in 40 years adn

ताज्या बातम्या