वर्ल्ड बॉक्सिंग कप २०२५ स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. गुरूवारी विजय सिंग पथिक क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला बॉक्सर्सने पदकांची रांग लावली. ४८ किलो वजनी गटात मिनाक्षीने सुवर्णपदक पटकावलं. तर ५४ किलो वजनी गटात प्रीतीने सुवर्णपदक पटकावलं. नुपूरने ८० किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या सोटिम्बोएवा ओल्टिनॉयवर ५-० असा विजय मिळवून उझबेकिस्तानच्या सोटिम्बोएवा ओल्टिनॉयवर ५-० असा विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
याआधी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात नुपूरला ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण यावेळी तिने सुवर्णपदक जिंकून तिने कोट्यावधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. हा तिच्यासाठी केवळ एक विजय नसून, गेल्या पराभवाचा बदला आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना नुपूर म्हणाली, “मला या सुवर्णपदकाची खूप जास्त गरज होती, कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ३-२ ने झाल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नव्हते. मला गेल्या एक महिन्यापासून याच गोष्टी आठवत होत्या. रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतरही मला हेच विचार यायचे की, मी अंतिम सामना गमावला होता. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा होता.”
याआधी सप्टेंबर महिन्यात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात नुपूरला ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. रौप्यपदत जिंकून भारतात परतल्यानंतर तिचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी तिने वर्ल्ड बॉक्सिंग कप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला होता. नुपूर त्यावेळी म्हणाली होती, “वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मी रौप्यपदक पटकावलं आहे.नोव्हेंबर महिन्यात वर्ल्डकप होणार आहे. त्या स्पर्धेत मी नक्कीच भारताला सुवर्णपदक जिंकून देणार.”
नुपूरने २ महिन्याआधीच देशासाठी सुवर्णपदक जिंकणार असा विश्वास व्यक्त केला होता,पण यावरून तिला ट्रोल देखील केलं गेलं. याबाबत बोलताना ती म्हणाली, “मी त्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते, मी आता रौप्यपदक जिंकलं आहे, पण रौप्यपदकानंतर मी सुवर्णपदक नक्की पटकावणार. त्यावेळी मला ट्रोल केलं गेलं होतं. अनेकांनी मला म्हटलं होतं की,इतका ओव्हर कॉन्फिडन्स कशासाठी? पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की, जोपर्यंत आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा विचार करणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट मिळणार नाही. त्यामुळे मी विनंती करते की, छोट्या छोट्या गोष्टींसाठी ट्रोल करू नका.” नुपूरने आता सुवर्णपदक जिंकून ट्रोल करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
