यंदाच्या आयपीएल हंगामात युवा शिलेदारांनी फटकेबाजीला नवा आयाम दिला आहे. युवा शिलेदार पदलालित्यापेक्षा बॅटस्विंगवर भर देतात. शरीराचं ठोस संतुलन आणि हात फैलावत फटकेबाजीसाठी मुक्त वापर ही त्यांची वैशिष्ट्यं आहेत. गोल्फ प्रशिक्षक आदित्य कानिटकर यांनी बॅट स्विंग, पॉवरहिटिंग यासंदर्भात अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.

‘वैभव सूर्यवंशी आणि हेनरिच क्लासन षटकार लगावताना गोल्फ स्टान्स घेतात. क्लासन उंच आहे. निसर्गाची देणगी असलेल्या लांब हातांमुळे त्याच्या फटक्यांना जोर मिळतो. क्लासनच्या तुलनेत वैभवची उंची कमी आहे पण त्याचं शरीर अतिशय वेगाने हलतं. त्याचं हँडआय कोऑर्डिनेशन अचंबित करणारं आहे. बॅटस्विंगला याची जोड मिळत असल्याने तो मारते ते फटके थक्क करणारे असतात. हेडस्टार्ट विलक्षण असतो. वैभव गोल्फ खेळू लागला तर कोसो दूर चेंडू फेकून देईल’.

‘गोल्फ आणि क्रिकेटमधलं साम्य म्हणजे ज्या पद्धतीने शरीराचा वरचा भाग आणि खालचा भाग यांची हालचाल होते. जे पल्लेदार षटकार मारतात त्यांना शरीराचं संतुलन कसं राखावं याची क्लृप्ती जमली आहे. क्रिकेटमध्ये चेंडू स्थिर नसतो, गोल्फमध्ये असतो. म्हणूनच षटकार हाणणे हे खास कौशल्य आहे. पण त्याला जे तंत्र लागतं ते गोल्फमधलं आहे’.

बॅटचा वेग आणि हातांचा वापर यांची चर्चा होते. पण गोल्फसारखा स्टान्स घेऊन फटकेबाजी करण्याचं तंत्र वेगळं असतं. यामध्ये शरीराच्या खालच्या भागाचा पायाचा वापर करून ऊर्जा तयार केली जाते. गोल्फमध्ये याला ग्राऊंड फोर्स असं म्हणतात. ही शक्ती पोट,बरगड्या यांच्याकडे आणि त्यानंतर हातांकडे संक्रमित होते.

‘टी२० प्रकार रुजण्यापूर्वी कसोटी प्रकार प्रामुख्याने होता. जमिनीलगत फटके लगावण्यासाठी शरीराच्या खालच्या भागाची गरजच पडत नसे. त्याऐवजी त्याचा वापर शरीर स्थिर करण्यासाठी होई. गोल्फमध्ये फटका उंच आणि दूरवर मारण्यासाठी ग्राऊंड फोर्सचा वापर होतो. ग्राऊंड फोर्स साठी ताकद लागते’.

‘फलंदाज स्क्वॅट पद्धतीने बसतो आणि ग्राऊंड फोर्सचा वापर करून फटका खेळतो. पाय-पोटऱ्या यांचा वापर होतो. म्हणूनच ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह प्रचंड ताकदवान नाहीत पण ते हेनरिच क्लासनसारखे जोरकस फटके लगावतात. काहीजणांचा उजवा पाय ताकदवान असतो काहींचा डावा. महेंद्रसिंग धोनी उजव्या पायाच्या जोरावर मोठे फटके खेळतो’.

‘गोल्फमध्ये १२० किमी ताशी स्विंग निर्माण होते. टी२० प्रकाराच्या आगमनानंतर ग्राऊंड फोर्सचा उपयोग करून षटकार मारण्यात येत आहेत. शरीराचा वरचा भाग, हात यांची ताकद लागतेच पण पाय-पोटऱ्या यांचं बळ महत्त्वाचं ठरतंय. निवडसमितीचे प्रमुख आणि माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर काटक शिडशिडीत असे. तरीही षटकार लगावण्यात ते माहीर होते’.

‘कपिल देव यांनी पॉवरहिटिंगचा पाया घातला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. युवराज सिंगने ग्राऊंड फोर्स पद्धतीने फटकेबाजीला न्याय दिला. स्टीव्हन स्मिथ, रिकी पॉन्टिंग, ग्लेन मॅक्सवेल यामध्ये प्रवीण आहेत.

माझा भाऊ हृषिकेश कानिटकरबरोबर माझं बॅट स्विंग, ग्राऊंड फोर्स याविषयावर खूपदा बोलणं होतं. गोल्फ आणि क्रिकेटचा संगम कसा होतो यावरही आम्ही बोलतो. युवा शिलेदार नेमक्या कशा पद्धतीने फटकेबाजी करतात जाणून घेऊया’.

अभिषेक शर्मा
ब्रायन लारा आणि युवराज सिंग या दिग्गजांच्या मार्गदर्शनात अभिषेकच्या फटकेबाजीला सुरेख पैलू पडले आहेत. डावखुरा अभिषेक बॅटवरची ग्रिप बदलतो आणि लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पट्ट्यात मनमुराद फटकेबाजी करतो. कव्हरच्या डोक्यावरून इनसाईड आऊट पद्धतीने चेंडू भिरकावून द्यायला त्याला आवडतं.

वैभव सूर्यवंशी
भारतीय क्रिकेटविश्वातला नवा तारा असं वर्णन होणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीची ताकद हालचालीपेक्षा बॅटस्पीडमध्ये आहे. जोरकस फटके मारण्यासाठी वैभव बॅट खुलेपणाने घुमवतो. मात्र असं करताना त्याची पावलं क्रीझमध्ये पक्की असतात. लॉन्गऑन ते स्क्वेअर लेग पट्ट्यात तो फटकेबाजी करतो. पदलालित्यापेक्षा बॅटला स्वैर घुमवून षटकार खेचण्यावर त्याचा भर असतो.

हेनरिच क्लासन
क्वलासन सूर गवसतो तेव्हा तो चेंडूच्या ठिकऱ्या उडवतो. खणखणीत बॅट स्विंग आणि पक्का बेस याबळावर क्लासन दांडपट्टारुपी फटकेबाजी करतो. ताकदीसाठी तो हाताचा सढळहस्ते उपयोग करून घेतो. क्लासन क्रीझमध्ये मागे उभा राहतो आणि फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करतो. लॉन्गऑन तसंच मिडविकेट क्षेत्रात तो मनमुराद फटकेबाजी करतो. गुडलेंथ टप्प्यावरचे चेंडूही मैदानाबाहेर फेकून देतो.

प्रियांश आर्य
दिल्ली प्रीमिअर लीगच्या माध्यमातून चमकलेला प्रियांश बॅटस्विंगच्या बळावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची कत्तल करतो. डाऊन द ट्रॅक न जाता तसंच पदलालित्याचा वापर करण्याऐवजी एका जागी उभं राहून तडाखेबंद फटकेबाजी करण्यावर त्याचा भर असतो. तो प्रामुख्याने ऑनसाईडला फटकेबाजी करतो. पिकअप फ्लिक फटका खेळत फाईन लेग क्षेत्रात धावा फटकावण्यात तो माहीर आहे.

यशस्वी जैस्वाल
गोलंदाज कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करणार आहे याचा अंदाज घेऊन तगड्या बॅटफ्लोद्वारे खेळण्याचा यशस्वीचा प्रयत्न असतो. हाय बॅकलिफ्टने खेळण्याचा त्याचा प्रयत्न असतो. शरीराचं संतुलन न गमावता बॅकफूटवर राहून खेळणं ही त्याची खासियत आहे. पूलच्या फटक्यासह मिडविकेट क्षेत्रात धावा करायला त्याला आवडतं.

संजू सॅमसन
दणकट बांध्याच्या संजूने फिरकीपटूंविरुद्धचा खेळ सुधारला आहे. कमीत कमी हालचाली आणि जास्तीतजास्त बॅट स्पीड हे संजूचं धोरण असतं. जागेवर ठोस उभं राहून हातांचा सढळहस्ते उपयोग करत संजू चेंडूवर प्रहार करतो. उत्तम टायमिंग लाभलेला संजू मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करतो.