Asad Rauf : आयसीसीच्या एलिट पॅनलमधील पंच आता विकतोय चपला आणि कपडे! का ते वाचा

लाहोरमधील लांदा बाजार हा स्वस्त व परवडणारे कपडे, चपला आणि इतर वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. काही दुकानांमध्ये सेकंड हँड वस्तूंची खरेदी-विक्रीही होते.

Asad Rauf ICC elite umpire panel to a shop owner
असद रौफ (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

‘राजाचा रंक होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही’, असा एक वाक्प्रचार आपल्याकडे आहे. म्हणजेच, सध्या अमाप श्रीमंत असलेली किंवा वैभवामध्ये लोळण घेत असलेली व्यक्ती क्षणात कंगाल होऊ शकते. अशीच काहीशी स्थिती आयसीसीच्या एलिट पॅनलमधील एका पंचाची झाली आहे. हा पंच सध्या लाहोरमधील एका स्थानिक बाजारात चपला आणि कपडे विकण्याचे काम करत आहे. असद रौफ, असे या पंचाचे नाव आहे. असे नेमके काय झाले की, असद रौफ यांच्यावर बाजारातील एका लहानशा दुकानात उभे राहण्याची वेळ आली.

२००० ते २०१३ या कालावधीमध्ये असद रौफ यांनी १७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले. यामध्ये ४९ कसोटी, ९८ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. इतकेच काय तर ते आयसीसी एलिट पॅनेलचाही भाग होते. तेच असद रौफ आता लाहोरमधील लांदा बाजारात चपला आणि कपड्यांचे दुकान चालवतात.

हेही वाचा – Ranji Trophy Final 2022 : “ते नसते तर मी कधीच…”, सर्फराज खानने ‘या’ व्यक्तीला दिले यशाचे श्रेय

पाकटीव्ही डॉट टीव्ही (Paktv.tv) या पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असद रौफ यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. ‘तुम्ही क्रिकेटमध्ये परत का नाही गेले?’, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “मी आयुष्यभर अनेक सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले, आता कोणालाही बघण्याची माझी इच्छा नाही, २०१३ पासून मी क्रिकेटपासून एकदमच संबंध तोडला आहे. कारण, मी जी गोष्ट एकदा सोडतो ती कायमस्वरूपी सोडून देतो,” असे रौफ म्हणाले.

सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचे आणि आयपीएल २०१३ दरम्यान मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात सामील असल्याचे आरोप असद रौफ यांच्यावर झाले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शिस्तपालन समितीने रौफ यांना दोषी ठरवले होते. २०१६ मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती. याबाबत बोलताना रौफ म्हणाले, “मी आयपीएलमध्ये माझा सर्वोत्तम वेळ घालवला आहे. माझा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांशी काहीही संबंध नव्हता. बीसीसीआयच्या बाजूने सर्व आरोप आले होते. मला स्पष्टीकरणाची संधी न देताच त्यांनी निर्णय घेतला.”

हेही वाचा – FIFA World Cup Qatar 2022 : फुटबॉलच्या कुंभमेळ्यादरम्यान दारू आणि सेक्सला बंदी! चाहत्यांसाठी कतारने जाहीर केली नियमांची यादी

२०१२ मध्ये एका मुंबईस्थित मॉडेलने असद रौफ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. रौफ यांनी तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे वचन दिले होते. मात्र, नंतर ते मागे हटले, असे या मॉडेलचे म्हणणे होते. रौफ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

‘आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजिद खान यांना, पाकिस्तानमधून येणार्‍या पंचांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यास सांगितल्यामुळे आपल्या कारकीर्दीला सुरुवात झाली,’ असे रौफ म्हणतात. आयपीएलच्या सहाव्या हंगामात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. आता ते लाहोरमधील लांदा बाजारात दुकान चालवतात.

हेही वाचा – Video : फलंदाज कसा बाद झाला हे गोलंदाजालादेखील समजले नाही, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील गोंधळ

लाहोरमधील लांदा बाजार हा स्वस्त आणि परवडणारे कपडे, चपला आणि इतर वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. काही दुकानांमध्ये सेकंड हँड वस्तूंची खरेदी-विक्रीही होते. अशा ठिकाणी रौफ यांचे दुकान आहे. मात्र, आपण हे दुकान स्वत:साठी नाही तर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चावलत असल्याचे ते म्हणाले.

“मला आता कसलाही लोभ नाही. मी भरपूर पैसे बघितले आहेत. माझा एक मुलगा दिव्यांग आहे तर दुसरा नुकताच अमेरिकेतून पदवी घेऊन परतला आहे. मी आणि माझी पत्नी दिवसातून पाच वेळा नमाज वाचतो,” असे असद रौफ म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fromer icc elite umpire asad rauf runs a shop in lahore landa bazaar vkk

Next Story
Ranji Trophy Final 2022 : “ते नसते तर मी कधीच…”, सर्फराज खानने ‘या’ व्यक्तीला दिले यशाचे श्रेय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी