Harmanpreet Kaur Funny Moment: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरूवात झाली आहे. नवी मुंबईत पहिल्या टप्प्यातील सामने झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने वडोदऱ्यात सुरू आहे. स्पर्धेतील १३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाणेफेकीच्या वेळी एक गमतीशीर घटना घडली. मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या संघात बदल केलेल्या खेळाडूंची नावं सांगत असताना गोंधळली. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या प्लेईंग ११ मध्ये केलेले बदल सांगितले. ज्यावेळी हरमनप्रीत कौरला प्लेईंग ११ मध्ये केलेल्या बदलांबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी, तिने संघात ४ बदल केले असल्याचं सांगितलं. मात्र समालोचकाने ते ४ बदल कोणते? असा प्रश्न विचारला असता हरमनप्रीत कौर गडबडली. ती काही क्षण थांबली आणि खेळाडूंची नावे आठवण्याच्या प्रयत्न करू लागली. तिने काही नावं सांगितली. पण शेवटी समालोचकाला तिला मदत करावी लागली. हा व्हिडीओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी हरमनप्रीत कौरची तुलना रोहित शर्मासोबत केली आहे. रोहित शर्मा देखील अनेकदा नाणेफेकीच्या वेळी कोणत्या खेळाडूला संघात स्थान दिलंय, हे विसरून जातो.
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या प्लेईंग ११ मध्ये ४ मोठे बदल केले आहेत. या सामन्यासाठी शबनिम इस्माइलला संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तर वैष्णवी शर्माला महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच हेली मॅथ्यूजला देखील संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तर राहिला फिरदौसला यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने देखील आपल्या प्लेईंग ११ मध्ये मोठा बदल केला आहे. दिल्लीने १६ वर्षीय दिया यादवला महिला प्रीमियर लीग स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी दिली आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
मुंबई इंडियन्स (MI): हेली मॅथ्यूज, सजीवन सजना, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), राहिला फिरदौस (यष्टीरक्षक), निकोला कॅरी, अमनजोत कौर, पूनम खेमनार, संस्कृती गुप्ता, शबनिम इस्माइल, वैष्णवी शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स (DC): शेफाली वर्मा, लिझेल ली (यष्टीरक्षक), लॉरा वोल्वार्ड, जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान कॅप, दीया यादव, निकी प्रसाद, स्नेह राणा, लुसी हॅमिल्टन, श्री चराणी, नंदनी शर्मा.
