अन्वय सावंत
‘जिथे प्रतिभेला मिळते संधी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) भारतीय क्रिकेटला बरेच काही दिले. भारतातील प्रतिभावान युवा खेळाडूंना जगासमोर स्वत:ची गुणवत्ता दाखवण्याची, इतर देशांतील आघाडीच्या खेळाडूंसोबत आणि विरोधात खेळण्याची संधी लाभली. परिणामी भारतीय संघाची अधिक सक्षम दुसरी फळी निर्माण झाली. तसेच भारतीय संघातील स्थान टिकवण्यासाठी अनुभवी खेळाडूंनाही कामगिरीत सातत्य राखणे भाग पडले. त्यामुळे ‘आयपीएल’ भारतीय क्रिकेटसाठी मोठी देणगी ठरली. मात्र, ‘आयपीएल’चा यंदाचा हंगाम भारतीय संघाची काहीशी चिंता वाढवणारा ठरला आहे.
या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यासाठी भारताने आता संघबांधणीला सुरुवात करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला बाद फेरीचा टप्पाही गाठता आला नव्हता. यंदा संघात काही बदल करत कामगिरीत सुधारणेचा भारताचा मानस असेल. ‘आयपीएल’मुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि संघबांधणी करणे सोपे जाईल, अशी भारतीय संघाला आशा होती. मात्र, यंदाच्या ‘आयपीएल’मधून कमावले कमी आणि गमावले अधिक असे चित्र निर्माण झाले आहे.
भारतासाठी सर्वात चिंतेचा विषय म्हणजे तारांकित फलंदाज विराट कोहलीची कामगिरी. एके काळी गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या कोहलीला गेल्या अडीच वर्षांपासून एकही शतक झळकावता आलेले नाही. तसेच यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही त्याला धावांसाठी झगडावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीला यंदा १३ सामन्यांत केवळ २३६ धावा करता आल्या आहेत. तो तीन वेळा पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बादही झाला आहे. तसेच पूर्वी उजव्या यष्टीबाहेरील चेंडू मारण्याच्या प्रयत्नात अडचणीत सापडणारा कोहली यंदा विविध पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. फिरकीपटूंच्या चेंडूने अधिक उसळी किंवा फिरकी घेतल्यास तो चाचपडताना दिसतो. पूर्वीसारखी आक्रमकता आणि आत्मविश्वासही त्याच्या देहबोलीत जाणवत नाही.
कोहलीप्रमाणेच भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला १२ सामन्यांत २१८ धावाच करता आल्या आहेत. कर्णधार म्हणूनही रोहितला यंदा छाप पाडता आलेली नाही. मुंबई संघातील त्याचा सलामीचा साथीदार इशान किशनलाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. तसेच भारतीय संघातील मधल्या फळीचे दावेदार श्रेयस अय्यर (३५१ धावा), ऋषभ पंत (२९४ धावा), संजू सॅमसन (३२७ धावा) आणि हार्दिक पंडय़ा (३४४ धावा) यांच्या कामगिरीचा आलेख चढता-उतरता राहिला आहे. याउलट राहुल त्रिपाठी (३१७ धावा) आणि तिलक वर्मा (३६८ धावा) यांनी आघाडीच्या फळीत, तर विजयवीराची भूमिका बजावताना दिनेश कार्तिक (२८५ धावा) आणि राहुल तेवतिया (२१५ धावा) यांनी चमकदार कामगिरी केली आहे. परंतु कार्तिक वगळता इतरांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. केएल राहुल (४५९ धावा) आणि शिखर धवन (४०२ धावा) या सलामीवीरांच्या खेळात सातत्य आहे, ही एक समाधानकारक बाब ठरली आहे.
सूर्यकुमार यादवने मुंबईकडून काही अप्रतिम खेळी केल्या. मात्र, स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान तो जायबंदी झाला. तसेच भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजालाही बरगडय़ांना झालेल्या दुखापतीमुळे ‘आयपीएल’बाहेर व्हावे लागले. वेगवान गोलंदाज दीपक चहरला आधी पायाच्या आणि मग पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. त्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये गोलंदाजीत भारताच्या दृष्टीने काही सकारात्मकता दिसून आली आहे. लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहल (२३ बळी), हर्षल पटेल (१८ बळी) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (११ बळी) यांनी प्रभावी मारा केला आहे. तसेच सातत्याने ताशी १५० किमीच्या गतीने मारा करणारा उमरान मलिक (१८ बळी) आणि डावखुरा मुकेश चौधरी (१६ बळी) यांसारख्या युवा वेगवान गोलंदाजांनी छाप पाडली आहे. पंजाबच्या अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला आहे. मात्र, फिरकीच्या विभागात चहलला साथीदार किंवा पर्याय मिळू शकलेला नाही. ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवने १२ सामन्यांत १८ बळी घेतले असले, तरी ८.७१च्या धावगतीने धावा दिल्या आहेत. अक्षर पटेल (४ बळी) आणि रवी बिश्नोई (९ बळी) यांनाही फारसे बळी मिळवता आलेले नाहीत. याचाही भारतीय संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागेल.
एकूणच दरवर्षीप्रमाणे यंदाही भारताला भविष्यातील तारे मिळाले आहेत, तरी सध्याच्या प्रमुख खेळाडूंपैकी काहींना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. भारताला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच, आर्यलडविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध तीन ट्वेन्टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार असून संघबांधणीसाठी त्यांचा पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा २००७ पासूनचा ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाचा दुष्काळ यंदाही कायम राहील, हे निश्चित!
anvay.sawant@expressindia.com