अनेक शतकं जुना दगडी भक्कम किल्ला, नागमोडी वळणाचे रस्ते, दोन बाजूंनी समुद्र, स्टँड्सऐवजी ग्रासबँक अर्थात गवताळ रचना यामुळे गॉल क्रिकेट स्टेडियम हे जगातल्या नयनरम्य स्टेडियम्सपैकी एक आहे. गॉल क्रिकेट क्लबचं मैदान असलेल्या या स्टेडियमचं पूर्वीचं नाव एस्प्सल्नेड असं होतं. मोठा इतिहास, नैसर्गिक आक्रमण असं बरंच काही या स्टेडियमने अनुभवलं आहे.
घोड्यांच्या शर्यतीसाठी १८७६ मध्ये हे स्टेडियम उभारण्यात आलं. पक्क्या स्वरुपाचं पॅव्हेलियन नव्हतं. १८९२ मध्ये ते तयार करण्यात आलं. १८८८ मध्ये इथे शालेय क्रिकेट सामना खेळवण्यात आला. त्यानंतर रिचमंड कॉलेज विरुद्ध महिंद्रा कॉलेज यांच्यातील मालिका या स्टेडियमवर खेळवण्यात येऊ लागली. तिला ‘लव्हर्स क्वारल’ असं नाव मिळालं. या क्रिकेटद्वंद्वाला १०० वर्षांचा इतिहास आहे.
१९२७ मध्ये अधिकृत पातळीवर हे मैदान क्रिकेटसाठी असल्याचं जाहीर करण्यात आलं. १९८४ मध्ये या मैदानावर फर्स्टक्लास क्रिकेटची लढत खेळवण्यात आली. आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मैदानात काही बदल करण्यात आले. १९९८ मध्ये या मैदानाचं पदार्पण झालं. या मैदानावर श्रीलंका-न्यूझीलंड कसोटी सामना खेळवण्यात आला. पाचूच्या बेटांवर, कसोटी सामन्याचं आयोजन करणारं हे सातवं मैदान ठरलं. त्याचवर्षी या मैदानावर वनडे लढत खेळवण्यात आली. मैदानावर कृत्रिम प्रकाशाची यंत्रणा नसल्यामुळे वनडे आणि टी२० सामन्यांचं आयोजन फारसं होत नाही. प्रामुख्याने कसोटी सामन्यांचं केंद्र अशी गॉलची ओळख झाली.
खुल्या पद्धतीच्या रचनेमुळे खेळाडूंना गॉलमध्ये खेळताना वाऱ्याचाही सामना करावा लागतो. किल्ल्यावर बसून किंवा मैदानातल्या ग्रासबँकवर चाहत्यांना खेळाचा आनंद लुटता येते. सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरू असताना किल्ला, समुद्राचे व्हिज्यु्अल्स वारंवार दाखवले जातात. अनेक युट्यूबर्स, इन्फ्ल्युएन्सर मैदानात तसंच किल्ल्याच्या विविध भागात बसून सामन्याचा आनंद लुटताना व्लॉग करतात. सोशल मीडियावरही मैदानाचे, किल्ल्याचे आणि समुद्राच्या पार्श्वभूमीचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. खेळाडूंनीही या मैदानात खेळणं हा सुरेख अनुभव असल्याचं अनेकदा सांगितलं आहे.
२००४ मध्ये मात्र या सुंदर परिसराला संकटाने तडाखा दिला. २००४ मध्ये श्रीलंकेतील एक कॉलेज आणि इंग्लंडमधल्या हॅरो स्कूल यांच्यातल्या लढतीवेळी सुनामी आली. सुनामीने गॉल स्टेडियम उद्धव्स्त झालं. संपूर्ण परिसराचं अपरिमित नुकसान झालं. काही दिवसांनंतर या मैदानात सुनामीने विस्थापित झालेल्यांसाठी शिबीर सुरू करण्यात आलं. मदतीचं साहित्य पुरवता यावं यासाठी मैदानात हेलिपॅड तयार करण्यात आलं.
जनजीवन पूर्वपदावर यायला दोन वर्ष लागली. त्यानंतर स्टेडियमचं नूतनीकरण सुरू करण्यात आलं. नव्या इमारती, नवं पॅव्हेलियन आणि मीडिया स्टँड उभारण्यात आलं. प्रेक्षकक्षमता वाढवण्यात आली. २००७ मध्ये मैदान पुन्हा सज्ज झालं. १७ डिसेंबर पासून श्रीलंका-इंग्लंड कसोटी या ठिकाणी खेळवण्यात आली. २०१० मध्ये याच मैदानावर महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनने याच मैदानावर ८००वी विकेट पटकावली. भारताच्या प्रग्यान ओझाला बाद करत मुरलीधरनने इतिहास घडवला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आजही मुरलीधरनच्याच नावावर आहे.
२०१७ मध्ये याच मैदानावर रंगना हेराथ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकावणारा डावखुरा फिरकीपटू झाला. रंगनाने डॅनियल व्हेटोरीला मागे टाकत विक्रम नावावर केला. त्याच वर्षी गॉलच्या मैदानावर वनडेचं आयोजन करण्यात आलं. तब्बल २० वर्षानंतर गॉलमध्ये वनडे सामना झाला.
गॉलची खेळपट्टी सर्वसाधारपणे फिरकीपटूंना अनुकूल असते. मुरलीधरन आणि हेराथच्या वाटचालीत गॉल मैदानाचा मोलाचा वाटा आहे. मैदानलगत असलेल्या किल्ल्याला प्रदीर्घ इतिहास आहे. समुद्राला साक्षी अशा या किल्ल्याची निर्मिती पोर्तुगीजांनी केली असली तरी त्याच्या विस्ताराचं काम डचांनी केलं. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. डचांनंतर ब्रिटिशांनी किल्ल्यावर राज्य केलं. ब्रिटिशांचं राज्य संपुष्टात आल्यावर श्रीलंकेच्या पुरातत्व खात्याकडे किल्ल्याची जबाबदारी आहे.
तब्बल ५२ हेक्टरवर पसरलेल्या या किल्ल्याच्या माध्यमातून चाहते क्रिकेट आणि पर्यटन अशा दोन्ही गोष्टींचा आनंद लुटतात. भारतीय संघाने गॉलच्या मैदानावर ५ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी २ जिंकलेत तर ३ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
